Sheetal Mhatre viral Video Case: शीतल म्हात्रे यांच्या तक्रारीनंतर दहिसर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता. या व्हायरल व्हिडीओ प्रकरणात दहिसर पोलिसांनी कल्याणमधून एका तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी कल्याणमधील तिसगाव परिसरातून ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेण्यात आलेला तरुण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता आहे.
ADVERTISEMENT
शिवसेना-भाजपच्या आशीर्वाद यात्रेतील माजी नगरसेवक शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शनिवारी मध्यरात्री व्हायरल झाला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शीतल म्हात्रे यांनी थेट ठाकरे गटावर आरोप केले. व्हायरल झालेला व्हिडीओ मॉर्फ्ड असून, युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी तो व्हायरल केल्याचा आरोप शीतल म्हात्रेंनी केला.
शनिवारी रात्री शीतल म्हात्रेंनी रितसर तक्रार दहिसर पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
Sheetal Mhatre: व्हायरल व्हिडीओवरून महिला आमदार भडकल्या, विधानसभेत गोंधळ
शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरण : आतापर्यंत चार जण पोलिसांच्या ताब्यात
शीतल म्हात्रे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्यानंतर दहिसर पोलिसांनी धरपकड सुरू केली. दहिसर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ३५४, ५०९, ५००, ३४ आणि ६७ अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी सुरूवातीला दोन जणांना ताब्यात घेतलं. मानस कुवर (वय 26) आणि अशोक मिश्रा (वय 45) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावं आहेत.
दरम्यान, रविवारीच एकाला शिवसैनिकांनी मारहाण करुन समतानगर पोलिसांच्या ताब्यात दिलं. हा इसम काँग्रेसशी (Congress) संबंधित असल्याचं सांगण्यात आलं. या तिघांचीही चौकशी सुरू असताना पोलिसांनी कल्याणमधून आणखी एकाला ताब्यात घेतलं.
Sheetal Mhatre: ‘आम्ही त्यांना फोडून काढतो’, व्हिडीओवरून रुपाली पाटलांचा चढला पारा
Sheetal Mhatre Case: कल्याणमधून पोलिसांनी कुणाला घेतलं ताब्यात?
शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणात पोलिसांनी रविवारी रात्री कल्याणमधून एका तरुणाला ताब्यात घेतलं. कल्याणमधील तिसगाव परिसरातून या तरुणाला ताब्यात घेतलं असून, विनायक डायरे असं या तरुणाचं नाव आहे. विनायक डायरे हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सोशल मीडिया सेलचा कार्यकर्ता आहे. दरम्यान, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप विनायक डायरेच्या कुटुंबीयांनी केला आहे. नावं सांगूनही पोलीस तक्रार दाखल करून घेत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्याबाहेर रात्री ठिय्या मांडत घोषणाबाजी केली.
Sheetal Mhatre: व्हायरल व्हिडीओवरून सुषमा अंधारेंनी शीतल म्हात्रेंनाच सुनावलं
विधानसभेतही गाजलं प्रकरण
शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडिओचे आज (13 मार्च) विधानसभेत पडसाद उमटले. आमदार मनीषा चौधरी, भारती लव्हेकर, यामिनी जाधव यांनी हा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडिओची चौकशी करून मास्टरमाईंड शोधून काढावा, अशी मागणी विधानसभेत केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिवसभराचे कामकाज संपण्यापूर्वी या विषयातले निवेदन सादर करावे, असे आदेश सरकारला दिले.
ADVERTISEMENT