महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर नागपूरमध्ये शिवसेनेला मोठं खिंडार पडलं आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी उप-महापौर शेखर सावरबांधे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत सावरबांधे यांनी मनगटावर घड्याळ बांधलं आहे.
ADVERTISEMENT
गेल्या काही दिवसांपासून नागपूरमध्ये शिवसेनेकडून आयात होत असलेल्या उमेदवारांमुळे सावरबांधे नाराज असल्याचं दिसून येत होतं. पक्ष नेतृत्वाकडून आपल्याला डावललं जात असल्याची भावना सावरबांधेंच्या मनात होती. नागपूर शहरात शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी सावरबांधे यांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या वेळी सावरबांधेंचं पक्षाला रामराम करणं हे धोक्याचं मानलं जातंय.
आयात उमेदवारांना पक्षात मानाचं स्थान मिळत असलेल्या नाराजी मुळे सावरबांधेंनी पक्ष सोडल्याचं कळतंय. मिळालेल्या माहितीनुसार सावरबांधेंसह आणखी काही जिल्हा आणि तालुका प्रमुख पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याचं कळतंय. सावरबांधेंच्या पाठोपाठ ही मंडळही शिवसेना सोडण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतरही शिवसेना नेत्यांची छोटी-मोठी कामं होत नव्हती. यामुळेच स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर पहायला मिळत आहे. यावर वेळेत तोडगा न काढल्यास पक्षाचं खिंडार आणखी मोठं होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT