नांदेड : ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी तथा शेकापचे नेते भाई केशवराव धोंडगे यांचं रविवारी निधन झालं. वयाच्या १०२ व्या वर्षी औरंगाबादच्या खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धोंडगे यांची काही दिवसांपासून तब्येत खालावली होती. २ महिन्यांपूर्वी त्यांचे हर्नियाचे आॅपरेशन झाले होते. त्यांनंतर काही दिवसांपासून त्यांना श्वासोश्वासाचा त्रास होऊ लागल्याने उपचारार्थ औरंगाबादमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पंधरा दिवसांपासून ते व्हेंटीलेटरवर होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
ADVERTISEMENT
मराठवाड्याची मुलूख मैदानी तोफ, ‘मन्याडचा वाघ’ अशी ओळख मिळविणारे केशवराव धोंडगे हे १९५७ ते १९९० या काळात सहावेळा विधानसभेत आमदार आणि त्यानंतर एकदा खासदार म्हणून निवडून आले होते. ३ महिन्यांपूर्वीच धोंडगे यांचा विधीमंडळात संसदपट्टू म्हणून गौरव करण्यात आला होता. तसंच केशवराव धोंडगे हे पहिले आणि एकमेव असे माजी आमदार होते ज्यांची जन्मशताब्दी राज्याच्या विधिमंडळात साजरी झाली आहे.
दिवंगत माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण आणि इतर काँग्रेस नेत्यांच्या समोर तगडं आव्हान उभं करत शेकापं पक्षाला जिवंत ठेवतं धोंडगे हे सहा वेळा आमदार आणि एकदा खासदार म्हणून निवडून आले होते. सभागृहातील कामकाजाची सुरुवात ‘वंदे मातरम’ने होणे, मराठवाड्यासाठी स्वतंत्र मंडळाची स्थापना, लोहा तालुक्याची निर्मिती धोंडगेंच्या प्रयत्नातून झाली होती. याशिवाय औरंगाबाद येथे आकाशवाणीचे केंद्र, खंडपीठ आणि परभणी कृषी विद्यापीठासाठीही त्यांनी पुढाकार घेतला होता. धोंडगेनी उपेक्षितांना न्याय देण्यासाठी गुराखी गडाचीही स्थापना केली होती.
लग्नासाठी स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त, अन् वरदक्षिणा म्हणून महाविद्यालयाला मदत…
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सत्कारप्रसंगी धोंडगे यांच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. केशवरावर धोंडगे हे मुहूर्त वगैर मानत नसतं. जेव्हा त्यांच्या लग्नाचा मुहूर्त काढण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी मुहूर्त वगैरे काही नाही, १५ ऑगस्ट म्हणजे देश स्वतंत्र झाला तो दिवस कुठल्या मुहूर्तापेक्षा कमी आहे का? म्हणत त्याच दिवशी ते विवाहबद्ध झाले होते.
तसंच वरदक्षिणा प्रथा देखील धोंडगे यांना मान्य नव्हती. वरदक्षिणा द्यायचीच असेल तर शिवाजी महाविद्यालयात शिकणाऱ्या गरीब मुलांसाठी काहीतरी करा, असे आवाहन धोंडगे यांनी केले होते. अशीही आठवण अशोक चव्हाण यांनी सभागृहात सांगितली होती.
ADVERTISEMENT