महाराष्ट्रातलं शिंदे फडणवीस सरकार हे शेतकऱ्यांप्रति असंवेदनशील आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. त्याऐवजी हे सरकार मेळावे आणि सण उत्सवांमध्ये अडकलं आहे. शेतकरी वर्गाला काय मदत हवी आहे? याचा आढावा का घेतला जात नाही? असा प्रश्न विचारत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे फडणवीस सरकावर टीकेचे ताशेरे झोडले आहेत.
ADVERTISEMENT
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा
राज्यात पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाला आहे. परतीच्या पावसाचाही फटका बसला आहे. अशात राज्यात ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे आणि शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली पाहिजे अशीही मागणी सुप्रिया सुळेंनी केली.
आरबीआयच्या विषयावर आमचं मत मागण्यात आलं नाही. मला आज माजी केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांची आठवण होते आहे. ते कायम म्हणायचे या विषयावर चर्चा करण्यात अर्थ नाही त्यामुळे चर्चा न केलेली बरी असं म्हणत सुप्रिया सुळेंनी RBI बाबतही प्रतिक्रिया दिली.
महिला क्रिकेटपटूंना समान मानधन देण्याबाबत काय म्हणाल्या सुप्रियाताई?
महिला क्रिकेटपटूंना जर पुरुष खेळाडूंप्रमाणेच समान मानधन देण्याचा निर्णय घेतला गेला असेल तर तो कौतुकास्पद आहे. बीसीसीआय ही एक स्वायत्त संस्था आहे त्यामुळे असे निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना आहे. मला या निर्णयाबाबत कौतुक वाटतं असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
बच्चू कडूंनी आरोपांची लड लावली त्यावरही बोलल्या सुप्रिया सुळे
अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अपक्ष आमदार रवी राणा यांना थेट आव्हान दिलं आहे. त्याबाबत विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की बच्चू कडूंचा स्वभाव खूप संवेदनशील आहे. त्यांचं वक्तव्य मी ऐकलं नाही. पण ज्या पद्धतीने गावात खोके सरकार असल्याची चर्चा आहे त्यामुळे त्यांची बदनामी होत असेल तर त्यासंबंधीचं उत्तर दिलं गेलं पाहिजे असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
ADVERTISEMENT