मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. जन आशीर्वाद यात्रेदरम्यान महाडमध्ये नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली चढवली असती. असं आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने आता महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी शिवसैनिकांनी राणेंविरोधात पोस्टरबाजी सुरु केली आहे.
ADVERTISEMENT
मुंबईच्या दादर-टीटी भागामध्ये शिवसेनेचे नगरसेवक अमेय घोले यांनी नारायण राणे यांना डिवचणारं एक भलं मोठं बॅनर लावलं आहे. या बॅनरवर नारायण राणे यांचा भला मोठा फोटो छापण्यात आला असून त्यावर ‘कोंबडी चोर’ असे मोठ्या अक्षरात लिहलं आहे. त्यामुळे नारायण राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता राणेंना डिवचणारं बॅनर मुंबईत लावण्यात आलं आहे.
शिवसैनिकांनी केलेल्या या बॅनरबाजीमुळे आता राणे विरुद्ध शिवसेना हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश
नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्याविरोधात महाड आणि नाशिक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आता नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत.
नाशिकमधील शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसात नारायण राणेंविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.
सध्या नारायण राणे हे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये आहेत. इथून त्यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा पुढील आणि महत्त्वाचा टप्पा सुरु होणार आहे. अशावेळी आता त्याच आधी जर राणेंना अटक करण्यात आली तर मात्र, कोकणासह मुंबईतील परिस्थिती देखील चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत कोणतं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं?
‘या माणसाकडे कोणतीही उपाययोजना नाही. काही झालं की, लॉकडाउनची भीती दाखवली जाते. महाराष्ट्रात आज व्यापाऱ्यांची हालत गंभीर आहे. आर्थिक फटका बसल्यामुळे ते 10 वर्ष माना वर काढू शकत नाही. आरोग्य विभागाची अवस्था भयावह आहे. स्टाफ नाही, डॉक्टर नाही, लस नाही अशी गंभीर परिस्थिती राज्यात आहे.’ असं म्हणत राणेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता.
CM Thackeray बाबत वादग्रस्त वक्तव्य भोवणार, Narayan Rane विरोधात पोलिसात गुन्हा दाखल
त्यानंतर पुढे ते असं म्हणाले की, ‘या मुख्यमंत्र्यांना देशाचा हिरक महोत्सव आहे की अमृत महोत्सव हेच माहिती नाही. 15 ऑगस्टला राज्यातील जनतेला उद्देशून भाषण करत असताना उद्धव ठाकरे मागे उभे असलेल्या मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना विचारतात हिरक महोत्सव आहे ना? मी त्या जागी असतो तर कानाखाली चढवली असती. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याविषयी मुख्यमंत्र्यांना माहिती नसावी हे किती चीड आणणारी गोष्ट आहे.’ असं वक्तव्य राणेंनी महाडमध्ये केले होतं.
ADVERTISEMENT