बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न भाजप पूर्ण करेल, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहीहंडी उत्सवादरम्यान केलं. त्यांच्या या विधानाला शिवसेनेनं सामना अग्रलेखातून उत्तर दिलंय. फडणवीसांचे बोल लबाड कोल्ह्यासारखे असल्याचं म्हणत शिवसेनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही निशाणा साधलाय.
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल शिवसेनेनं काय म्हटलंय?
“महाराष्ट्रात शिंदे आणि फडणवीस गटाची सत्ता आली. पण राज्यात कायदेशीर सरकार स्थापन झाले काय? हा प्रश्न जनतेला पडू लागला आहे. सरकारच्या नावाखाली थिल्लरपणाच चालला आहे. मुख्यमंत्री म्हणून फडणवीस जितके प्रगल्भ, शहाणे होते त्या प्रतिष्ठेचे शिंदे गटाबरोबर मातेरे झालेले दिसत आहे. राज्याच्या प्रश्नांवर ते बोलत नाहीत. त्यांचे बोलणे फक्त शिवसेनेवर आहे. शिवसेना फोडूनही त्यांच्या मनात शिवसेनेचे भय आहे. त्यांच्या मानगुटीवर शिवसेना बसलीच आहे. फडणवीस मुंबईतील दहीहंड्या फोडत फिरले”, असं म्हणत शिवसेनेनं दहीहंडी कार्यक्रमात केलेल्या विधानाचा समाचार घेतला आहे.
मोदींनीही निर्बंध घातले होते ना?; शिंदे-फडणवीसांना शिवसेनेचा सवाल
“दहीहंडीचा आनंदोत्सव कोणाला नको? सगळ्यांनाच हवाय. पण सर सलामत तो पगडी पचास! दोन वर्षे उत्सव बंदी होती ती काही मागील सरकारला हौस होती म्हणून नाही. कोरोनामुळे मोदी साहेबांनीच निर्बंध घातले होते ना? आता म्हणे आमच्या राज्यात उत्सव बंदी नाही. अहो देवेंद्रजी, राज्याचे आरोग्य ठिकठाक करून, जवळजवळ कोरोनामुक्त करूनच राज्य तुमच्याकडे सोपवले. पण गेल्या दोन दिवसांच्या उत्सवानंतरचे काय चित्र आहे?”, असा सवाल करत शिवसेनेनं कोरोना आणि साथींच्या आजाराकडे सरकारचं लक्ष वेधलंय.
“फडणवीसांनी दोन दिवसांपूर्वी ‘बाळासाहेबांसाठी भाजपास मते द्या!’ असे आवाहन केले. त्यावर आम्ही म्हणतो, ‘बाळासाहेबांच्या नावावर कसली मते मागता? तुमचं ते मोदी पर्व, मोदी वादळ ओसरलं काय?’ मुंबई महानगरपालिकेत या मंडळींना शिवसेनेचा पराभव करायचा आहे व शिवसेनेचा पराभव करण्यासाठी ते बाळासाहेबांच्याच नावाचा वापर करीत आहेत. मुंबईचा महापौर त्यांना भाजपचाच म्हणजे दिल्लीश्वरांच्या मर्जीचा करायचा आहे आणि शिंदे गटाची त्यास मान्यता आहे”, असं म्हणत सामनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकेची तोफ डागण्यात आलीये.
गद्दार फडणवीसांना खरे वाटताहेत- शिवसेना
“तुम्ही ठाणे लुटा, आम्ही मुंबईचा लचका तोडतो अशी लांडगेशाहीतील तडजोड झालेली दिसते. पुन्हा बाळासाहेबांचे नाव घेत मुंबईशीही बेईमानी सुरू आहे. फडणवीस म्हणतात, आम्ही खऱ्या शिवसेनेबरोबर आहोत. लोक ज्यांना फुटीर, गद्दार म्हणतात असे लोक फडणवीसांना ‘खरे’ वगैरे वाटत असतील तर या देशाचे, एकंदरीत हिंदू संस्कृतीचे काही खरे नाही. आम्ही म्हणतो, ‘आजचा भाजप अजिबात खरा नाही. अटलबिहारी वाजपेयी, आडवाणी युगातील भाजप आज उरला आहे काय? वाजपेयींचा भाजप शब्दाला आणि इमानाला जागणारा होता. त्या भाजपचा वंश तर सोडा, पण अंशही उरला नाही”, अशी टीका शिवसेनेनं केली आहे.
शिंदे गटातील नेत्याची उंदरांशी तुलना?
“आम्ही त्या भाजपची साथ सोडली व आमच्या वेगळ्या हिंदुत्वाच्या वाटेने निघालो. आम्ही आमची राजकीय भूमिका आहे तशीच ठेवली आहे. आम्ही हिंदुत्ववादी आहोत, भाजपचे गुलाम नाही. आम्ही महाराष्ट्राचे इमानी सेवक आहोत, दिल्लीचे चरणदास नाही. आमची हिंदुत्व निष्ठा व महाराष्ट्र स्वाभिमान संशयातीत आहे. आगगाडीत बसणाऱ्या माणसांना झाडे आणि पर्वत पळतात असे वाटते. पण झाडे आणि पर्वत काही पळत नाहीत. ते आहे तेथेच असतात. शिवसेना म्हणजे सह्याद्रीच्या उंच कडेकपारीच आहे. उंदरांना तेथपर्यंत पोहोचता येणार नाही”, अशा शब्दात शिवसेनेनं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.
“फडणवीस हे उचकी लागल्याप्रमाणे बाळासाहेबांच्या नावाचा जप करीत आहेत. काय तर म्हणे, ‘मुंबई महापालिकेत भाजपास मते द्या. आम्ही बाळासाहेबांचे स्वप्न साकार करू.’ काय हे ढोंग? बाळासाहेबांनी ढोंगाचा सदैव तिरस्कार केला. पण या मंबाजींना खरेच बाळासाहेब कळलेत का? बाळासाहेबांची कोणती स्वप्ने तुम्ही साकार करणार आहात? शिवसेनेत फूट पाडून व त्या बळावर मुंबईवरील भगवा उतरवण्याचे तुमचे स्वप्न हे काय बाळासाहेबांचे स्वप्न झाले? मऱ्हाटी जनता तुमच्या ढोंगावर आणि सोंगावर थुंकते!”, अशा शब्दात शिवसेनेनं सामना अग्रलेखातून भाजपवर टीकेचे बाण डागले आहेत.
“फडणवीस वगैरे पुढारी बाळासाहेबांचे स्वप्न उराशी कवटाळून बसले आहेत. 2014 मध्ये शिवसेनेशी ‘युती’ तोडताना या महामंडलेश्वरांना बाळासाहेब आठवले नाहीत. 2019 मध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत दिलेला शब्द तोडतानाही त्यांना बाळासाहेबांच्या स्वप्नांचे स्मरण झाले नाही. आता मोठे आले बाळासाहेबांचे स्वप्न साकार करायला!”
“वाजपेयी-आडवाणींना विसरणारे बाळासाहेबांचे स्वप्न काय पूर्ण करणार?”
“फडणवीसांचे बोल हे लबाड कोल्ह्याचे आवतण आहे. मुंबई-ठाणेकरांनी सावध राहायला हवे. राज्यात फक्त थिल्लरपणा सुरू आहे. सत्य फक्त हेच आहे की, मुंबईतून मराठी एकजूट संपवायची आहे व त्यासाठी शिवसेनेवर घाव आणि घाव घालायचे आहेत. बाळासाहेबांचे स्वप्न वगैरे ही भाजपच्या तोंडची भाषा हे कारस्थान आहे. हे लोक अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी या मायबापांना विसरले ते बाळासाहेबांचे स्वप्न कसले साकार करणार?”, असा सवाल करत शिवसेनेनं देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांना लक्ष्य केलं.
“तोंडपूजा माणसांची जगात कधीच उणीव नसते. पण शिवसेना म्हणजे जनतेची शक्ती आहे. ही शक्ती दुर्बल होऊ नये म्हणून आम्ही तळमळतो. हेच बाळासाहेबांचे स्वप्न आहे. शिंदे गटाचे मुख्यमंत्रीपद हा साबणाचा बुडबुडा आहे. महाराष्ट्रात चीड आहे, संताप आहे. आम्ही शिवसेनेच्या उपनेत्यांना महाराष्ट्रात पाठवले आहे. आदित्य चांद्यापासून बांद्यापर्यंत फिरत आहे. लोकांचा प्रचंड प्रतिसाद त्याला मिळत आहे. लवकरच आम्ही स्वतः महाराष्ट्र पिंजून नव्हे तर घुसळून काढणार आहोत”, असं शिवसेनेनं सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
“मुंबई गिळायचं तुमचं स्वप्न शिवसेना पूर्ण होऊ देणार नाही”
“गद्दारांना त्यांची जागा दाखवून देऊच, पण शिवसेना फोडणाऱ्यांनाही याच जमिनीत गाडून दाखवू. हेच बाळासाहेबांचे स्वप्न आहे. शिवरायांचा महाराष्ट्र आहे असे तोंडाने बोलायचे व कृती औरंगजेबाची करायची. हे धंदे चालणार नाहीत. मुंबई गिळायची हे तुमचे स्वप्न शिवसेना पूर्ण होऊ देणार नाही. हेच बाळासाहेबांचे स्वप्न! घोडा मैदान लांब नाही. तोपर्यंत शिंदे गटाकडून तेल मालीश करून घ्या!”, असा आव्हान शिवसेनेनं देवेंद्र फडणवीस आणि भाजपला दिलं आहे.
ADVERTISEMENT