राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर झालेल्या हिंसक आंदोलनावर राजकीय वर्तुळात अजूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. संपकरी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाबद्दल आता केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी भूमिका मांडली आहे. आठवलेंनी या घटनेसाठी ठाकरे सरकारला जबाबदार धरलं आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा भाजपशी जुळवून घेण्याचा सल्लाही दिला.
ADVERTISEMENT
रामदास आठवले यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. “बाळासाहेब ठाकरे असते, तर उद्धव ठाकरे यांना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर कधीच जाऊ दिलं नसते. अडीच-अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्याचा विचार करून उद्धव ठाकरे यांनी भाजपाबरोबर यावं. त्यासाठी अजूनही वेळ गेलेली नाही,” असा सल्ला त्यांनी दिला.
“राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेशी मी सहमत नाही. विरोधाला विरोध योग्य नाही. राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे असून, उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे वारसदार आहेत. ते पुन्हा आमच्याबरोबर येण्याचा निर्णय बदलत नाही. याबद्दल मला वाईट वाटत आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांचा विचार बदलून आमच्या सोबत सत्तेत यावे,” अशी इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं.
रामदास आठवले यांना शरद पवारांच्या घराबाहेरील हिंसक आंदोलनाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले, “शरद पवार यांच्या घरावरील हल्ला निंदनीय असून, या हल्ल्यास उद्धव ठाकरे सरकार जबाबदार आहे.”
“राज्य सरकारने एसटी कामगारांच्या भावनेचा विचार करायला हवा. त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात. मागील कित्येक महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. एसटी कामगारांच्या भावनांचा विचार न केल्यानं त्यांचा उद्रेक झाला असून, यातून हा हल्ला झाला आहे. अशा प्रकारचा हल्ला करणं योग्य नसून ही घटना निंदनीय आहे. शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याबाबत पोलिसांना माहिती नव्हती का?,” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
‘हल्लेखोर एस.टी कामगारांना कामावर घेणार नाही,’ अशी भूमिका परिवहन मंत्री अनिल परब यांनी मांडली. याबद्दल आठवले म्हणाले, “हल्ल्यात सहभागी असलेल्या कामगारांना कामावर न घेण्याची भूमिका देखील चुकीची आहे,” असं त्यांनी सांगितलं.
“जेएनयू विद्यापीठातील घटनेबद्दलही आठवलेंनी मत मांडलं. “देशातील सर्वात महत्वाचे जेएनयू विद्यापीठ असून, तिथे अनेक वेळा वादाचे प्रकार घडले आहेत. कालची घटना लक्षात घेता, आपली विचाराधारा वेगवेगळी असली, तरीही प्रत्येकाला आपले काम करण्याचा अधिकार आहे. तेथील विद्यार्थ्यांच्या दोन गटात वाद झाले. अशा घटना होता कामा नये. या घटनेची चौकशी करून कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.
ADVERTISEMENT