उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा पार पडला. शिंदे आणि ठाकरेंनी एकमेकांवर राजकीय वार केले. पण, सगळ्यांना पडलेला प्रश्न जो होता की, या मेळाव्यात कुणाचा आवाज घुमला? आवाज फाऊंडेशनने केलेल्या पाहणीतून ठाकरेंच्या मेळाव्यात नेत्यांची भाषण वरच्या आवाजात झालीये. महत्त्वाचं म्हणजे माजी महापौर आणि उपनेत्या किशोरी पेडणेकरांचा आवाज सर्वाधिक नोंदवण्यात आलाय.
ADVERTISEMENT
शिवसेनेतल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंसाठी महत्त्वाचा मानला जाणारा दसरा मेळावा पार पडला. दसरा मेळाव्यासाठी दोन्ही बाजूंनी ताकद लावली गेली. ठाकरे आणि शिंदेंची भाषणंही झाली, पण मेळाव्यात कुणाचा आवाज सर्वाधिक होता? तेच आपण समजून घेऊयात.
शिवाजी पार्क आणि बीकेसीतल्या मैदानावर झालेल्या मेळाव्याच्या आवाजाची डेसिबलमध्ये आवाज फाऊंडेशनकडून नोंद करण्यात आलीये. या फाऊंडेशनच्या अहवालानुसार भाषणावेळी सर्वाधिक उंच आवाज ठाकरे गटातल्या नेत्यांचा नोंदवला गेलाय.
ठाकरे गटातल्या कोणत्या नेत्यांचा आवाज होता सर्वाधिक?
शिवसेनेचा मेळावा शिवाजी पार्कवर झाला. या मेळाव्यात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यापासून ते किशोरी पेडणेकर यांच्यापर्यंत अनेक नेत्यांची भाषण झाली. या नेत्यांमध्ये भाषणावेळी सर्वाधिक आवाज होता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा!
किशोरी पेडणेकर यांचा भाषणावेळी सर्वात कमी आवाज ८४.६ डेसिबल इतका होता. तर सर्वाधिक आवाज ९७ डेसिबल इतका होता. ठाकरेंच्या गटातल्या कोणत्याही नेत्यांचा आवाज इतका नोंदवला गेला नाही.
किशोरी पेडणेकर यांच्याबरोबर सर्वाधिक आवाज नोंदवल्या गेलेल्या नेत्यांच्या यादीत दुसरं नाव आहे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं. अंबादास दानवे यांचा आवाज ८७.४ ते ९६.६ डेसिबल इतका होता.
दखल घेण्यासारखी बाब म्हणजे शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांचाही आवाज कमालीचा चढलेला नोंदवला गेलाय. सुभाष देसाई यांचा भाषणावेळी आवाज ८७.९ ते ९३.१ डेसिबल इतका होता. अलिकडेच शिवसेनेत प्रवेश केलेल्या आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांचं भाषणादरम्यान आवाज 77.6 ते ९३.६ डेसिबल इतका होता.
विधिमंडळात भाषणांमुळे चर्चत राहणारे शिवसेनेचे उपनेते भास्कर जाधव यांचा आवाज इतर नेत्यांच्या तुलनेत कमी होता. भास्कर जाधवांचा आवाज ७५.४ ते ९२.१ डेसिबल इतका होता.
शिंदे गटातल्या कोणत्या नेत्यांचा आवाज होता सर्वाधिक?
शिंदे गटातल्या अनेक नेत्यांनी दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरून भाषणं केली. यात सर्वाधिक आवाज होता तो खासदार धैर्यशील माने यांचा. त्यांचा भाषणादरम्यान आवाज ८८.५ डेसिबल इतका नोंदवला गेलाय. किरण पावसकर यांचा ७८.८८.५ डेसिबल या दरम्यान होता.
शहाजी बापू पाटील यांचा भाषणादरम्यान आवाज ८२.४ डेसिबल इतका होता. त्याचबरोबर खासदार राहुल शेवाळे यांचा ७८.८ डेसिबल, अरुणा गवळी ८३.९ डेसिबल, शरद पोंक्षे ८२.८ डेसिबल, गुलाबराव पाटील ८१.१ ते ८६ डेसिबल, रामदास कदम ८४.२ डेसिबल इतक्या आवाजाची नोंद झालीये.
शिंदेंचा आवाज जास्त होता की, ठाकरेंचा?
दसरा मेळाव्यात महत्त्वाची भाषण होती ती उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची. उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्क मैदानावर भाषण केलं, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बीकेसी मैदानावर. भाषणावेळी सर्वाधिक आवाज एकनाथ शिंदेंचा नोंदवला गेलाय. एकनाथ शिंदेंचा भाषणादरम्यान आवाज ८३.५ ते ८९.६ डेसिबल इतका होता. तर उद्धव ठाकरेंचा आवाज ६८.६ ते ८८.४ डेसिबल इतका होता.
ADVERTISEMENT