पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक झाली आहे. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत ५ सप्टेंबरपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा तुरुंगातला मुक्काम वाढला आहे. अशात आता संजय राऊत यांनी आपण आपल्या अटकेविषयी पुस्तक लिहित आहोत अशी माहिती कोर्ट परिसरात सूत्रांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात अटक
३१ जुलैला संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीने अटक केली. ८ दिवस ईडी कोठडी सुनावल्यानंतर त्यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. ही मुदत आज संपत असल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यावेळी न्यायालयाने त्यांच्या कोठडीत वाढ केली आहे. अशात कोर्ट परिसरात संजय राऊत पुस्तक लिहित आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
नेमकं काय म्हटलं आहे संजय राऊत यांनी पुस्तकाबाबत?
माझ्यावर जी केस दाखल करण्यात आली आहे ती पूर्ण केस खोटी आहे.माझा त्या केसशी काहीही संबंध नाही. प्रवीण राऊत माझे नातेवाईक आणि इतर दोघांना ओळखतो. सच के साथ लढ सकते हैं झुठ के साथ नहीं. त्यामुळे या सगळ्या अनुभवांवर मी एक पुस्तक लिहितो आहे. जेलच्या आत नियमांनुसार वृत्तपत्रं वाचण्यास मिळतात. माझी प्रकृती स्वस्थ आहे अशीही माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
शिवसेना खासदार यांची रवानगी आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली आहे. या ठिकाणी त्यांना घरचं जेवण आणि औषधं पुरवण्याची मुभा न्यायालयाने दिली आहे. आता ५ सप्टेंबरपर्यंत संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली आहे. संजय राऊत यांना अटक केल्यानंतर त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचीही त्यांच्या समोर बसवून चौकशी करण्यात आली. त्यांनाही मनी लाँड्रींग प्रकरणात समन्स बजावण्यात आलं होतं.
संजय राऊत यांच्या भांडुप येथील घरी काय घडलं?
२० जुलै आणि २७ जुलैला समन्स बजावल्यानंतर संजय राऊत हे उपस्थित राहिले नाही. संसदेचं अधिवेशन सुरू असल्यानं उपस्थित राहू शकत नाही, असं संजय राऊतांनी ईडी कार्यालयाला कळवलं होतं. दरम्यान, ३१ जुलै रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांचं एक पथक संजय राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी दाखल झालं. सकाळी पथक दाखल झाल्यानंतर राऊत यांना अटक होणार, अशी चर्चा सुरू झाली होती.
३१ जुलैला दुपारी चार वाजेपर्यंत ईडीचे अधिकारी संजय राऊत यांच्या घरीच होते. संसदेचं अधिवेशन सुरू असताना ईडी कार्यालयात घेऊन जाऊ शकत नाही, असं संजय राऊतांकडून ईडी अधिकाऱ्यांना सांगितलं जात होतं. संजय राऊतांच्या वकिलांनीही याचं कारणावरून ईडीच्या अधिकाऱ्यांना विरोध दर्शवला. नऊ ते दहा तास चाललेल्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांना भांडुप येथील निवासस्थानावरून ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं होतं. त्यानंतर ३१ जुलैला रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.
ADVERTISEMENT