राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि शिवसेना यांच्यात वाद पेटला आहे हे आता दिसून येतं आहे. कारण अमोल कोल्हे यांनी जी टीका केली त्या टीकेला आता शिवसेनेचे प्रवक्ते किशोर कान्हेरे यांनी खरमरीत उत्तर दिलं आहे. पुण्यातील शिरूर मतदारसंघाचे बळे बळे खासदार अमोल कोल्हे यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. अमोल कोल्हे म्हणतात शरद पवार यांच्या आशीर्वादाने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री मग राष्ट्रवादी कुणाच्या सहकार्याने सत्तेत? असा प्रश्न किशोर कान्हेरे यांनी विचारला आहे.
ADVERTISEMENT
आणखी काय म्हणाले आहेत किशोर कान्हेरे?
अमोल कोल्हे यांच्या स्मरणशक्तीच्या परीक्षेची वेळ आली आहे बहुतेक. तयार स्क्रिप्ट वाचून बडबड करणारे कलावंत कधीकधी स्मरणशक्ती विसरतात. अमोल कोल्हे यांचं आज तसंच झालं. आपण उद्धवसाहेबांच्या मेहेरबानीमुळे राजकारणात आलो याचाच त्यांना विसर पडला आहे. अंगापेक्षा पोंगा जास्त झाला की असे होते. अमोल कोल्हे ज्या उद्धव ठाकरेंमुळे आपल्याला आणि आपल्या पक्षाला सत्तेची फळं चाखायला मिळाली किमान त्यांना विसरू नका.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दस्तुरखुद्द शरद पवार हे देखील उद्धव ठाकरे यांच्याशी सल्ला मसलत करतात. तुम्ही कशाला विचार करता. तेवढी तुमची कुवतही नाही आणि क्षमताही नाही. दिग्दर्शकाने लिहून दिलेले स्क्रिप्ट वाचा आणि अभिनय करून पोटापाण्याचे पाहा. फार डोके चालवू नका असा सल्लाही किशोर कान्हेरे यांनी खासदार अमोल कोल्हे यांना दिला आहे.
काय म्हणाले होते अमोल कोल्हे?
शिवसंपर्क अभियानावर बोलताना डॉ कोल्हे म्हणाले की, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आमच्याही मनात आदर आहे. 100 टक्के आदर आहे. मुख्यमंत्र्याविषयी आदर नसता तर आज जे आरोप करतात त्यांनी माझी संसदेतील भाषणे बाहेर काढून पाहावीत. त्रास होईल मला संसदेत बोलताना बघून, पण एकदा भाषण काढून बघा ना. महाराष्ट्र सरकारची, माननीय मुख्यमंत्र्यांची बाजू संसदेत अभिमानाने कोण मांडतं हे तुम्हाला समजून जाईल आणि मग सांगा आम्हाला मुख्यमंत्र्यांबद्दल आदर आहे किंवा नाही.
या मुख्यमंत्र्यांनी त्यांची कामं लोकांपर्यंत पोहचवावी, महाविकास आघाडीचं काम लोकांपर्यंत पोहचावं म्हणून या अभियानाची सुरुवात करायला दिली पण या अभियानाची काम सोडून फक्त आमच्यावर टीका करणं हाच जर एककलमी कार्यक्रम असेल आणि हा एककलमी कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या नावामागे लपवला जात असेल तर प्रामाणिकपणे सांगतो माननीय मुख्यमंत्र्याबद्दल आदर आहे मात्र ते मुख्यमंत्रिपदावर आहेत ते कारण आदरणीय पवार साहेबांचा आशीर्वाद त्यांच्या डोक्यावर आहे.’
काय झाला वाद?
पुणे नाशिक महामार्गवरील खेड घाट बायपासच्या कामाच्या वचनपूर्ती करण्याचं थोतांड केल्याचा आरोप करत शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांच्यावर काल चांगलाच निशाणा साधला होता आणि शिवसैनिकांसोबत उद्घाटन करत बाह्यवळण मार्ग प्रवाशांसाठी खुला केला होता. आता आज डॉ. अमोल कोल्हे यांनी याच सगळ्या प्रकारावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे तसंच मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावर शरद पवारांचा हात आहे म्हणून ते मुख्यमंत्री आहेत असं वक्तव्य केलं आहे.
ADVERTISEMENT