हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर सरकारची फजिती झाली. विरोधकांनी अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानं शिंदे-फडणवीसांची कोंडी झाली. फडणवीसांनी झालेल्या आरोपांवर सावरासारव करण्याचाही प्रयत्न केला. याच मुद्द्यावरून शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) देवेंद्र फडणवीसांवर पलटवार केलाय. त्याचबरोबर विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेबद्दलही शंका उपस्थित केलीये.
ADVERTISEMENT
शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सामना अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह मंत्र्यांवर झालेल्या आरोपांवरून सरकारला लक्ष्य केलंय. “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, ‘विरोधी पक्ष कसला बॉम्ब फोडणार? त्यांच्याकडे लवंगी फटाकादेखील नाही.’ फडणवीस यांचं हे विधान आश्चर्यकारक आहे. फडणवीस सध्या भ्रष्टाचाराचा वेताळ पाठीवर घेऊन फिरत आहेत व महाराष्ट्र लुटून खाण्याचा हट्ट सोडायला वेताळ तयार नाही. फडणवीस यांना रोज उठून भ्रष्टाचार व लुटमारीच्या नव्या प्रकरणाची वकिली करावी लागते,” असं म्हणत शिवसेनेनं (UBT) फडणवीसांना डिवचलं आहे.
“आमच्या राज्यात शे-पाचशे कोटींचे घोटाळे होणारच असेच फडणवीस यांना सांगायचं आहे काय? संजय राठोड, उदय सामंत, शंभू देसाई अशा मंत्र्यांचेही घोटाळे समोर आले आहेत व ही भ्रष्टाचाराची अंतर्वस्त्र धुण्याचं काम महाराष्ट्रात फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांना करावे लागत आहे,” अशा शब्दात ठाकरेंच्या शिवसेनेनं फडणवीसांना चिमटा काढलाय.
फडणवीस ते गोगावले : अजित पवारांनी एक तास वाभाडे काढले; सभागृह फक्त ऐकत राहिलं!
विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर शंका! सामना अग्रलेखात काय म्हटलंय?
“नागपुरात विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढले आहे आणि कृषिमंत्री सत्तार वसुलीत दंग आहेत. विधानसभेत भ्रष्टाचारविरोधी हंगामा सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष विरोधी नेत्यांना नियमानंही बोलू देत नाहीत. स्वातंत्र्य व लोकशाहीची ही उघड गळचेपीच आहे. सरकारातील मंत्री रोज नवे भूखंड पचवून ढेकर देत आहेत व फडणवीस या भ्रष्टाचाराचे समर्थन करीत आहेत,” असं भाष्य सामना अग्रलेखातून विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीबद्दल करण्यात आलंय.
अनिल परब यांना आणखी एक संधी देतो, आरोप सिद्ध करा अन्यथा… : शंभुराज देसाईंचा इशारा
“सभोवती भ्रष्टाचारविरोधी बॉम्ब फुटत असतानाही ते म्हणतात, ‘कुठे काय? मला तर लवंगी फटाक्याचाही आवाज ऐकू येत नाही.’ या जादूटोण्यास काय म्हणावे? नाकासमोर भ्रष्टाचार सुरू आहे, पण फडणवीसांना काहीच दिसत नाही, ऐकू येत नाही. त्यांना कर्णपिशाचाने ग्रासले आहे काय? तसे असेल तर महाराष्ट्राच्या भविष्याविषयी आम्हाला चिंता वाटते! हनुमानाच्या शेपटास आग लावून देण्याचा उपद्व्याप त्या काळात झाला. त्या शेपटाने रावणाची लंका जळून गेली हे विसरू नका,” असं अशी टीका सामनातून करण्यात आलीये.
ADVERTISEMENT