– राकेश गुडेकर, रत्नागिरी प्रतिनिधी
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना सुरु झाला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊन इब्राहीमच्या हस्तकासोबत केलेल्या मालमत्तेच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने मलिकांना अटक केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांची ही कारवाई म्हणजे मलिकांवर राग काढण्याचा प्रकार असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. नवाब मलिक हे गेल्या काही दिवसांपासून तपास यंत्रणांविरुद्ध बोलत होते, त्यामुळे अशी काहीतरी कारवाई होईल याची कल्पना होतीच असंही शरद पवार यांनी सांगितलं.
महाविकास आघाडीच्या या टीकेचा समचारा घेताना शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी नारायण राणेंना झालेल्या अटकेचा दाखला घेत, केंद्रीय मंत्र्यांना जेवत असताना अटक करण्यात आली. त्यामुळे आता तुम्ही कोणत्या तोंडाने आकसाने कारवाई झाली असं बोलू शकता असा प्रश्न विचारला आहे.
सत्तेच्या गैरवापराचं हे उदाहरण, अशी कारवाई होईल याची कल्पना होतीच – शरद पवार
रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत असताना विनायक मेटेंनी महाविकास आघाडीचा समाचार घेतला. “करावे तसे भरावे अशी मराठीत एक म्हण आहे. जर त्यांनी काही केलं असेल तर त्यांनी शिक्षा भोगली पाहिजे. काही केलं नसेल तर ते बाहेर येतील. महाविकास आघाडी सरकारचे मंत्री केंद्रावर टीका करतात हा अत्यंत दुतोंडीपणाचा कळस आहे. याच केंद्र सरकारमधील एका मंत्र्याला तुम्ही जेवत असताना अटक केलीत. मग आता कोणत्या तोंडाने बोलता की ही कारवाई (मलिकांवरील कारवाई) आकसाने झाली आहे?” मलिक यांनी काही केलं असेल तर त्याची फळं ते भोगतील आणि काही केलं नसेल तर तावुन सुलाखून बाहेर येतील असंही विनायक मेटे म्हणाले.
प्रॉपर्टी बळकावण्यासाठी नवाब मलिकांनी धमकी दिल्याचं दाखवण्यासाठी ईडीने सादर केली 1989 ची तक्रार
यावेळी बोलत असताना विनायक मेटेंनी राज्यातल्या ठाकरे सरकारला अफजलखानाची उपमा दिली. शिवछत्रपतींच्या स्मारकाबद्दल सरकारने घेतलेल्या भूमिकेवर मेटे यांनी सडकून टीका केली. ठाकरे सरकारच्या तावडीतून छत्रपती शिवाजी महाराज कधी सुटतील या करिता साकडं घालायला मी भराडी देवीला जातोय असं म्हणत मेटेंनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम व्यवस्थितपणे सुरू होत असताना काही लोक सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने यानंतर तोंडी स्थगिती दिली आहे. जगातली ही एकमेव केस असावी. मात्र यानंतरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने आजपर्यंत घेतलेली नाही. ती सुनावणी व्हावी यासाठी या महाविकास आघाडी सरकारने गेल्या अडीच वर्षामध्ये दहा मिनिटांचा सुद्धा वेळ काढला नाही. यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक करण्यात अजिबात स्वारस्य राहिलेलं नाही. सभागृहामध्ये प्रत्येक अधिवेशनात आम्ही आवाज उठविला, मात्र आजतागायत यांनी फक्त थापा मारल्या. यापलीकडे महाराजांच्या पदरात काही पडलेलं नाही. उलट महाराजांनी आग्र्याहून सुटका त्यांच्या बुद्धिकौशल्याने, चातुर्याने करून घेतली त्या मात्र या ठाकरे सरकारच्या तावडीतून महाराज कधी सुटतील यासाठी साकडं घालायला मी भराडी देवीला जातोय असं म्हणत मेटे यांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला.
ADVERTISEMENT