भाजपच्या मुरजी पटेल यांची उमेदवारी वादात : पाच आक्षेप घेत ठाकरे गटाकडून आरोपांची माळ

मुंबई तक

• 09:44 AM • 15 Oct 2022

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी अधिकृतपणे सुरु झाली आहे. भाजप आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे दोन पक्ष या निमित्ताने आमने-सामने आले आहेत. शुक्रवारी अर्ज भरल्यानंतर आज दोन्ही बाजूंनी प्रचाराला सुरुवात झाली आहे. दरम्यान प्रचाराच्या पहिल्याच दिवशी भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांची उमेदवारी वादात सापडली आहे. ठाकरे गटाकडून पटेल यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेण्यात […]

Mumbaitak
follow google news

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी अधिकृतपणे सुरु झाली आहे. भाजप आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे दोन पक्ष या निमित्ताने आमने-सामने आले आहेत. शुक्रवारी अर्ज भरल्यानंतर आज दोन्ही बाजूंनी प्रचाराला सुरुवात झाली आहे. दरम्यान प्रचाराच्या पहिल्याच दिवशी भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांची उमेदवारी वादात सापडली आहे. ठाकरे गटाकडून पटेल यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेण्यात आला असून त्यांच्यावर विविध आरोपही करण्यात आले.

हे वाचलं का?

या निवडणुकीतील ठाकरे गटाचे पर्यायी उमेदवार संदीप राजू नाईक यांनी शनिवारी याबाबत पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी उमेदवार म्हणून पटेल यांच्या अर्जावर आक्षेप घेतले. तसंच पटेल यांची उमेदवारी रद्द करावी, त्यांचा अर्ज बाद करावा अशी मागणीही नाईक यांनी निवडणूक आयोगाला माध्यमांमधून केली. यावेळी नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही काही सवाल केले.

राजू नाईक काय म्हणाले?

पत्रकार परिषदेत बोलताना नाईक म्हणाले, आम्ही आज निवडणूक आयोगासमोर ५ आक्षेप घेतले आहेत. पहिला म्हणजे, मुरजी पटेल यांना शासनाच्या आदेशानुसार ६ वर्ष निवडणूक लढविता येत नाही. त्यांना बाद करण्यात आलं आहे. उच्च न्यायालयानेही त्यांना जातीच्या कागदपत्रांमध्ये दोषी ठरवलं आहे. तसंच सर्वोच्च न्यायालयानेही यावर शिक्कामोर्तब केला आहे. मग आयोगाने त्यांचा अर्ज कसा स्वीकारला? असा सवाल नाईक यांनी विचारला.

तसंच मुरजी पटेल यांना बाद केल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे दाद मागितली. मला ज्या तरतुदींनुसार बाद करण्यात आलं होतं, ती तरतुद रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर उच्च न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. त्यांना तो अर्ज मागे घ्यावा लागला होता. या याचिकेचा उल्लेख ही या अर्जामध्ये नाही, असाही दावा नाईक यांनी केला.

मुरजी पटेल यांचा मतदानाचा अधिकार निवडणूक आयोगाने अद्याप का काढून घेतला नाही? असा सवाल नाईक यांनी विचारला. जर त्यांचा अधिकार काढून घेतला असेल तर त्याबाबत आम्हाला माहिती द्यावीर अशी मागणीही त्यांनी आयोगाकडे केली.

नाईक म्हणाले, मुरजी पटेल यांच्यावर बोगस चेक देण्याबाबत खटला आहे. तो त्यांनी लपविला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार प्रलंबित खटल्यांची माहिती वृत्तपत्रांमधून प्रसारित करावी लागते. ते ही पटेल यांनी केलेलं नाही. मग त्यानंतरही त्यांचा अर्ज कसा स्वीकारला? एमआयडीसीमध्ये पात्र लोकांच्या घरावर त्यांनी डल्ला मारला आहे. कित्येक लोकांना बेघर केले आहे. असा आरोपही नाईक यांनी यावेळी केला.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सवाल विचारत नाईक म्हणाले की, शिवसेनेच्या एका उमेदवाराला पाडण्यासाठी तुम्ही एका भ्रष्टाचारी माणसाला का पाठिंबा देत आहात? तर भ्रष्टाचारामध्ये अखंड बुडालेल्या माणसाला तुम्ही का पक्षातर्फे उभं केलं, असा सवाल त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला. याशिवाय ऋतुजा लटके या स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवार असल्याचा दावाही त्यांनी केला.

    follow whatsapp