आपला दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, तिथेच मेळावा घेणार अशी गर्जना उद्धव ठाकरेंनी केली. मुंबईतल्या नेस्को मैदानावर शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा पार पडतो आहे. त्यात उद्धव ठाकरेंनी तिखट शैलीत भाषण करत ठाकरी भाषेत एकनाथ शिंदे आणि भाजपवर घणाघाती टीका केली.
ADVERTISEMENT
काय म्हणाले आहेत उद्धव ठाकरे?
व्यासपीठावर एक रिकामी खुर्ची पाहिली संजय राऊत. उद्या एक चौकट येईल संजय राऊत मिंधे गटात गेले. पण तसं होणार नाही, मिंधे सगळे तिकडे गेले आहेत. व्यासपीठावर आल्यानंतर पाहिलं आमचे वडील आहेत ना जागेवर? मुलं पळवणारी टोळी पाहिली आहे मात्र बाप पळवणारी टोळी आता महाराष्ट्रात फिरते आहे. मी काय त्यांच्याबद्दल बोलणार नाही. तुम्ही सगळे त्यांना उत्तर द्यालच असं म्हणत गटप्रमुखांच्या मेळाव्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर टीका केली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात पातशाह होते, आदिलशाह, निजामशाह होते. त्यांच्याच कुळातले शाह आत्ता काही दिवसांपूर्वी येऊन गेले. अमित शाह देशाचे गृहमंत्री ते काय म्हणाले की शिवसेनेले जमीन दाखवायची. आपल्याला जमीन दाखवायची आहे असं म्हणणाऱ्यांना आपण आस्मान दाखवल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
वेदांत प्रकल्प गेला, त्यानंतर त्याबद्दल धादांत खोटं बोललं जातं आहे. आरोप प्रत्यारोप केलं. मिंधे गट नुसता तमाशा बघतो आहे. महाराष्ट्राची बाजू घेऊन का सांगत नाहीत? आज दिल्लीत गेले आहेत दिल्लीत गोंधळ आणि गल्लीत मुजरा. कुणामुळे गेला?ते सोडून द्या तुम्ही आणून दाखवा राज्यात प्रकल्प मी तुम्हाला साथ देतो विरोधक तुम्हाला त्यासाठी साथ देतील असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
मुंबई जिंकायची म्हणजे काय? मुंबईकरांची आधी मनं जिंका. नुसती निवडणूक जिंकू नका असंही उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावलं आहे. कुणीही या देशात मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर त्याच्या कार्यकर्त्यांची एवढी गर्दी करून दाखवावी हे माझं आव्हान आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले. आमचं ठरलंय, यांचा बदल करायचा आहे. काय ठरलंय? मुंबई पिळायची, मुंबई विकायची आणि दिल्लीश्वरांच्या चरणी वाहून टाकायची हे ठरलं आहे का? असाही टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. जे बोलतो ते करतो आणि ते केलंय की नाही ते तुम्हाला घरोघरी जाऊन सांगायचं आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT