मुंबई : मुख्यमंत्रीपद ज्यांना पाहिजे होतं, त्यांनी ते घेतलं. त्यांच्याबरोबर ज्यांना सगळं काही देऊनही मनात एक धुसफूस होती. आणखी काही होतं, नाराज होते. सगळं देताय तरी आम्ही नाराज होते, तेही गेले. ठिकाय. आपण बोललो, पण ते सगळं सहन केलं. शिवसेना प्रमुखांचा मुलगा मुख्यमंत्री नको. मीच व्हायला पाहिजे. इथपर्यंत कुणाकुणाचे हट्ट, मनसुबे असू शकतात. पण आता स्वत: शिवसेनाप्रमुख व्हायला निघालेत. हे मात्र जरा अति होतोय, असं म्हणतं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला. शिवसेनेचे नाव आणि पक्ष चिन्ह गोठवल्यानंतर ते पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले होते.
ADVERTISEMENT
40 डोक्यांच्या रावणानं प्रभु रामाचं धनुष्य-बाणं गोठवलं :
उद्धव ठाकरे म्हणाले, ज्या धनुष्य-बाणांची शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे मनोभावे पूजा करत होते, जो धनुष्यबाण आजही त्यांच्या देवाऱ्यात आहे. पण 40 डोक्यांच्या रावणानं प्रभु रामाचं हे धनुष्य बाणं गोठवलं. यासाठी थिजलेली मनं आणि गोठलेलं रक्तच पाहिजे. कारण शिवसेना म्हटलं की सळसळतं रक्त आणि तापलेलं डोकं आठवतं. गोठलेल्या रक्तवाल्यांच इकडे कामचं नाही.
उद्धव ठाकरेंचा भाजपवरही निशाणा :
उलट्या काळजाची काही माणसं आणि त्यांचे कंपू फिरतात, त्यांचा राग येतो. पण वाईट वाटतं की, ज्या शिवसेनेनं तुम्हाला राजकीय जन्म दिला, जी शिवसेना तुमची राजकीय आई आहे. त्याच आईच्या काळजात कट्यार घुसवली. शिवसेना हे पवित्र नाव गोठवलं. शिवसेनेचं पवित्र चिन्ह गोठवलं. त्यांना आता आनंदानं उकळ्या फुटत असतील.
पण त्याहीपेक्षा त्यांच्या मागे जी महाशक्ती आहे, तिला जास्त आनंद होत असेल. बघा आम्ही करुन दाखवलं. जे आम्हाला जमलं नाही, ते त्यांचीच माणसं फोडून त्यांच्याच माध्यमातून करुन दाखवलं. कशी ही माणसं काय? मिळवलं तुम्ही? ज्या शिवसेनेनं मराठी माणसाला आधार दिला, ज्या शिवसेनेनं मराठी मन पेटवली आणि हिंदु आस्मिता जपली, त्या शिवसेनेचा घात तुम्ही करायला निघाला आहात, ते शिवसेना हे पवित्र नाव तुम्ही गोठवलं, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
शिवसेनाप्रमुखांनी दिलेली हिंमत तुम्ही गोठवली :
मराठी माणसाठी एकजूट तुम्ही फोडायाला निघालात. या देशात हिंदु म्हणायची कुणाची हिंमत नव्हती, ती हिंमत ज्या शिवसेनाप्रमुखांनी दिली ती हिंमत तुम्ही गोठवली. हे हिंदुत्व असेच उभं राहिलं नाही, त्यासाठी शिवसेनाप्रमुखांनी अंगावर धोके स्वीकारलेत, आम्ही सुरक्षेमध्ये राहत होतो, पण नाही म्हटलं तरी अतिरेक्यांचा धोका आणि धमक्या यासोबत हे सगळं पुढे आणलं आहे, असेही ठाकरे म्हणाले.
शिवसेना आणि तुमच्या नावाच काय संबध आहे?
मुळात शिवसेना आणि तुमच्या नावाच काय संबध आहे? जे नाव माझ्या आजोबांनी दिलं, जे नाव माझ्या वडिलांनी रुजवलं, तोच विचार मी पुढे घेऊन जात आहे. पण तुम्ही त्याचा घात करताय. तसेच तुमची बुद्धी गोठलेली नसेल तर आता बाळासाहेबांचं नाव न वापरता समोर या. स्वतःचा पक्ष काढा, भाजपमध्ये जा, असेही आव्हान ठाकरे यांनी यावेळी दिले. आजही तुम्हाला शिवसेना पाहिजे, बाळासाहेब पाहिजेत, पण बाळासाहेबांचा मुलगा नको, अशी टीकाही त्यांनी केली.
काँग्रेसने केलं नाही ते तुम्ही करताय; मग गुन्हेगार कोण?
उद्धव ठाकरे म्हणाले, आज जे काही चाललं आहे, ते फार विचित्र आहे. मी दसरा मेळाव्यात पण याचा उल्लेख केला. शिवसैनिकांना दमदाट्या सुरु आहेत. म्हणजे आणीबाणाीच्या काळात जे इंदिरा गांधींनी केले नव्हते, ते तुम्ही केलेत. शिवसेनेवर बंदी घाला ही मागणी त्यावेळी काही स्थानिक नेत्यांनी इंदिरा गांधी यांच्याकडे केली होती. पण त्यांनी सगळं बघितल्यानंतर शिवसेनेवर बंदी घालायची नाही असं सांगितलं.
याचा अर्थ असा नाही की शिवसैनिकांना त्रास झाला नाही. स्थानबद्धता, तडीपाऱ्या, खटले दाखल केले जाणे या गोष्टी चालू होत्या. पण तेव्हा सरकार काँग्रेसचे होते. आज जे बोंबलत आहात, तुम्ही काँग्रेस सोबत गेल्यावर हिंदुत्व सोडलं. तेव्हा तर काँग्रेस आणि आपला काहीही संबंध नव्हता. पण काँग्रेसने कधीही शिवसेनेवर बंदी घालण्याचा विचार केला नव्हता. आज तुम्ही ज्यांच्यासोबत गेला आहात, तुमचा हेतू आता स्पष्ट झालेला आहे, तो हेतू शिवसेना संपविण्याचा आहे. मग जे काँग्रेसने केले नाही ते तुम्ही करत आहात. मग गुन्हेगार कोण आहे? काँग्रेस की तुम्ही? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी विचारला.
ADVERTISEMENT