खासदार श्रीकांत शिंदे मनसेच्या कार्यालायात, महायुतीच्या चर्चेवर उत्तर देत म्हणाले…

मुंबई तक

• 04:59 AM • 24 Oct 2022

मुंबईत झालेल्या मनसेच्या दीपोत्सवात राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच मंचावर दिसले होते. त्यानंतर आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीतल्या मनसेच्या दीपोत्सवला उपस्थिती दर्शवली. तसंच त्याच ठिकाणी श्रीकांत शिंदे यांनीही त्यांचा कार्यक्रम ठेवला होता. या सगळ्यामुळे आता भाजप-मनसे आणि शिंदे गट यांची युती होणार का? या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण […]

Mumbaitak
follow google news

मुंबईत झालेल्या मनसेच्या दीपोत्सवात राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच मंचावर दिसले होते. त्यानंतर आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीतल्या मनसेच्या दीपोत्सवला उपस्थिती दर्शवली. तसंच त्याच ठिकाणी श्रीकांत शिंदे यांनीही त्यांचा कार्यक्रम ठेवला होता. या सगळ्यामुळे आता भाजप-मनसे आणि शिंदे गट यांची युती होणार का? या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. अशात श्रीकांत शिंदे यांनाही याबाबत प्रश्न विचारण्यात आला.

हे वाचलं का?

श्रीकांत शिंदे यांना जेव्हा महायुतीबाबत प्रश्न विचारला

श्रीकांत शिंदे यांना जेव्हा महायुतीबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की आता तुम्ही नवे नवे अर्थ लावू नका. मनसेच्या माध्यमातून दरवर्षी दीपोत्सव साजरा केला जातो. चांगलं चित्र पाहायला मिळतं आहे. विरोधक एकत्र आले तर चांगलं आहे. दिवाळी सणानिमित्त सगळे एकत्र आहेत, किती विरोधक असलो तरीही सजेशन आणि ऑब्जेक्शन घेऊन पुढे जायचं त्यातून चांगला मार्ग निघतो असंही श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय.

खासदार श्रीकांत शिंदे यांचे राजकीय विरोधक म्हणून मनसेचे आमदार राजू पाटील यांची ओळख आहे. मात्र आता श्रीकांत शिंदे यांची मनसेसोबत जवळीक वाढताना दिसते आहे. स्थानिक पातळीवरही समीकरणं जुळवण्याची तयारी सुरू झाली आहे त्यामुळे येत्या काळात राजकारण कोणत्या दिशेने जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मनसेने भविष्यत शिंदे आणि फडणवीस यांच्यासोबत युती करायला काही हरकत नाही असंही वक्तव्य मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केलं आहे. आम्हाला आमचा पक्ष वाढवायाचा आहे. साहेबांचा आदेश आला तर नक्कीच युती करू असंही राजू पाटील यांनी म्हटलं आहे.

भविष्यात मनसेची या दोन पक्षांशी युती होऊ शकेल का? असं विचारलं असता आम्ही स्वबळावर लढणार आहोत हे आधीच राज साहेबांनी सांगितलं आहे. मात्र भविष्यात तशी काही परिस्थिती निर्माण झाली तर एकत्र यायला हरकत नाही असंही राजू पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच सध्या ज्या युती आणि आघाडी होत आहेत त्यावर कुणाकडे काहीही बोलायला उरलेलं नाही. आम्ही आमचा पक्ष वाढवायचा असेल तर जो आदेश येईल ते आम्ही मान्य करूच.

    follow whatsapp