-एजाज खान, मुंबई
ADVERTISEMENT
युवा सेना अध्यक्ष आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे हे निष्ठा यात्रेच्या निमित्ताने शिवसैनिकांच्या भेटी घेत आहे. शिवसेनेच्या शाखांना भेट देऊन सभा घेत आहेत. पक्षात उभी फूट पडल्यानंतर पक्ष नेतृत्व खडबडून जागे झाले आहे. २१ ते २३ जुलैदरम्यान शिवसेनेची शिव संवाद यात्रा निघणार आहे. आज सभेमध्ये बोलताना आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर जोरदार टीका केली.
आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले ”उद्या बरोबर एक महिना होईल, 20 जूनला जी गद्दारी झाली त्याला एक महिना पुर्ण होईल. ही जी गद्दारी झाली आहे ती महाराष्ट्रासोबत झाली आहे.” पुढे आदित्य ठाकरे म्हणाले की रोज बातम्यांमध्ये नाट्य सुरू आहे. हे नाट्य आपण खाली पाडणारच, हे स्वतःच्या राजकीय स्वार्थ्यासाठी चाललं आहे. हे सर्व स्वतः सोबत किती आमदार येतात, खासदार येतात हे दिल्लीला दाखवायला सुरू आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
हे बंडखोर नाही, तर गद्दार; आदित्य ठाकरेंचा निशाणा
हे सर्व लोक बंडखोर नाही, हे गद्दार आहेत, जर महाराष्ट्राबद्दल यांच्या मनात चांगलं असतं तर ते आधी सुरत मग गुवाहाटी मग गोव्याला गेले नसते असेही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. कुर्ल्याला एक इमारत कोसळली तर मी तिथे 2 वाजता होतो, पण तिकडचा आमदार गुवाहाटीमध्ये माजा मारत होता असेही ठाकरे म्हणाले.
…तेव्हा चोरी पकडली गेली
आदित्य ठाकरे यांनी विधानसभेतील अनुभवही उपस्थित लोकांना सांगितला. ते म्हणाले ”विधानसभेत कोणी नजरेला नजर मिळवत नव्हते, त्यांना मी हेच विचारात होतो की आम्ही कमी काय केलं. कदाचित आम्ही राजकारण केलं नाही म्हणून हे झालं असेल. मला एकच समाधान आहे की या काळात उध्दव साहेब कुटुंब प्रमुख म्हणून समोर आले. बाळासाहेब, उध्दव ठाकरे कधी विधान भवनात गेले नाहीत म्हणून यांची चोरी कळत नव्हती, पण उध्दव साहेब विधानसभेत गेले तेव्हा चोरी पकडली गेली.”
परत येणाऱ्यांसाठी दरवाजे खुले
ज्यांना परत यायचे आहे त्यांच्यासाठी दरवाजे अजून खुले आहेत. थोडी जरी हिम्मत असेल तर निवडणुकीला सामोरे जा, आणि मग जो निर्णय असेल तो मान्य असेल. यांनी आमदारांची जमवाजमव कधी सुरू केली जेव्हा उध्दव साहेबांचे 2 ऑपरेशन झाले. ज्यावेळी ते कोणाला भेटू शकत नव्हते त्यावेळी यांनी जमवाजमव सुरू केली. राजकारणात चांगल्या लोकांना स्थान असतं ते आता दाखवून देण्याची गरज आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT