मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे. भाजप, काँग्रेससह सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावली आहे. भारत जोडो यात्रेवर असलेल्या राहुल गांधी यांनीही गुजरातमध्ये प्रचार केला. प्रशासनचीही तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अशातच महाराष्ट्रातील मंत्रीही गुजरातमध्ये प्रचाराला जात असल्याचा आणि यामुळे मंत्रिमंडळाची बैठक रद्द झाली असल्याचा दावा करतं शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.
ADVERTISEMENT
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकारने शिवसेनेचे आमदार गुजरातला पळवले, मग हक्काचे प्रकल्प गुजरातला नेऊन इथल्या तरुणांचा रोजगार पळवला. आता तिथल्याच निवडणुकीच्या प्रचारात हे सरकार व्यस्त आहे. १ तासही यांच्याकडे नाही. काल मंत्रीमंडळाची बैठक का रद्द झाली?
पीक विमा, ओला दुष्काळ, वीज प्रश्न अश्या शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांकडे दुर्लक्ष करून परराज्यातल्या निवडणुकांवर खोके सरकार लक्ष केंद्रित करतंय. मंत्रीमंडळ बैठक रद्द होतेय. महाराष्ट्रात हे काय चाललंय? हे सरकार नेमकं आहे कुणासाठी? या सरकारला महाराष्ट्रातल्या जनतेसाठी वेळ मिळणार आहे का?
‘महामंडळ’ की ‘प्राधिकरण’? अश्या गोंधळात खोके सरकार जनतेच्या आरोग्याशी खेळत आहे. औषध पुरवठ्याचा प्रश्न सोडून यांना निवडणूकांची काळजी जास्त हे दिसतंय. तुम्ही शिवसेनेशी, शिवसैनिकांशी गद्दारी केलीत, पण महाराष्ट्रासोबत गद्दारी करू नका!
बुधवारीही केली होती टीका :
दरम्यान काल बिहार दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वीही आदित्य ठाकरे यांनी या मुद्द्यावरु शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला होता. ते म्हणाले होते, मी एक बातमी ऐकली की आज मंत्रिमंडळाची बैठक रद्द झाली. कारण एक पक्ष दुसऱ्या राज्याच्या प्रचारात व्यस्त आहे. यांनी आधी आमदार मग प्रकल्प आणि आता मंत्री गुजरातला पाठवले. महाराष्ट्रात बेरोजगार, ओला दुष्काळ असे असंख्य प्रश्न असताना मंत्रिमंडळ तिकडे प्रचारात व्यस्त आहे. महाराष्ट्रासाठी एक तास दिला असता तर काही वाईट झाले नसते, असही ते म्हणाले होते.
ADVERTISEMENT