अकोला : राष्ट्रवादी वगळून शिवसेना-काँग्रेससोबत युती करण्याचा प्रस्ताव असल्याचा पुनरुच्चार वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांनी नुकताच केला होता. या प्रस्तावावर ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे लवकरच ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.
ADVERTISEMENT
सोमवारी दुपारी अकोल्यामध्ये बोलत असताना अंबादास दानवे म्हणाले, शिवशक्ती-भिमशक्ती एकत्र यावी हा विचार महाराष्ट्रात सर्वप्रथम शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनीच मांडला होता. प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेसोबत जाण्याच्या भूमिकेबद्दल थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलावं. मात्र जेवढे घटक सोबत येतील त्यांना घेऊन समोर जाण्याची शिवसेनेची तयारी आहे, असे त्यांनी सांगितले.
तसेच औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये प्रकाश आंबेडकर आधीपासूनच आमच्यासोबत आहेत, असेही दानवे म्हणाले. त्यातून वंचित बहुजन आघाडीला आतापर्यंत उपमहापौर, स्थायी समिती सभापती पद या माध्यमांतून सत्तेत वाटा दिला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेसाठी हा संक्रमणाचा काळ आहे, वाईट काळ नव्हे. शिवसेना परत नव्याने उभी राहील, असा निर्धार त्यांनी बोलून दाखविला.
प्रकाश आंबडेकर काय म्हणाले होते?
दोन दिवसांपूर्वी जालना इथे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले होते, राष्ट्रवादी काँग्रेस वगळून शिवसेना-काँग्रेससोबत युती करण्याचा प्रस्ताव आहे. आमच्याकडून दोन्ही पक्षांना निरोप गेला आहे. आता त्यांनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करायला हवी. अद्याप त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही.
काँग्रेस आणि शिवसेनेची भूमिका जोपर्यंत स्पष्ट होत नाही, तोपर्यंत सर्वच पक्ष वेगवेगळे लढतील असं आम्ही गृहीत धरलं आहे. त्यामुळे आम्हीही स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीला लागलो आहोत, राष्ट्रवादीशी युती करण्यास आमची का तयारी नाही हे योग्य वेळी सांगू, असंही आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT