मुंबई : रायगड जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, महाडचे आमदार भरत गोगावले आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी यापूर्वीच साथ सोडल्यानंतर आता माजी आमदार अवधूत तटकरे यांनीही ठाकरेंची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
ADVERTISEMENT
मुंबईतील भाजप पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये अवधूत तटकरे यांच्यासह नगरसेवक कीर्ती भट, कुसुम गुप्ता आणि नरेश पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना अवधूत तटकरे म्हणाले, कार्यकर्त्यांची बैठक झाल्यानंतर आग्रहास्तव भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात भाजप कशी वाढेल यासाठी आता प्रयत्न करणार आहोत. जिल्ह्यातील आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी आणि रवी पाटील यांच्यासमवेत काम करणार असल्याची ग्वाही देखील तटकरे यांनी दिली.
अवधूत तटकरे, हे तटकरे कुटुंबातील एक बडे प्रस्थ मानले जाते. रोह्याचे माजी नगराध्यक्ष, माजी आमदार, प्रशासनात आणि पक्षात दबदबा असणारे आक्रमक व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख आहे. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांचा राजकीय वारसदार म्हणून अवधूत ओळखले जात होते. मात्र सुनिल तटकरे हे स्वत: किंवा त्यांच्या मुलांचाच विचार करत असल्याचा आरोप करत अवधूत तटकरे आणि सुनिल तटकरे यांच्यातील संबंध ताणले गेले.
रोहा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून सुनील तटकरे यांच्या कुटुंबात वाद निर्माण झाला होता. मात्र शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद संपुष्टात आल्याचे जाहीर करण्यात आले होते. पण याला फार यश आलं नव्हतं. त्याचवेळी 2016 ला अवधूत तटकरेंच्या छोट्या भावाने शिवसेनेत प्रवेश केला होता. तर 2019 साली अवधूत तटकरे आणि माजी आमदार अनिल तटकरे हेही शिवसेनेत दाखल झाले. मात्र ते तिथंही फारसे रमले नाही. अखेरीस आज अवधूत तटकरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
ADVERTISEMENT