मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. अमृता फडणवीसांची वक्तव्य सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती भाष्य करणारी असतात, त्यामुळे अनेकदा देवेंद्र फडणवीस अडचणीत आलेले पाहायला मिळतात.
ADVERTISEMENT
नुकतंच अमृता फडणवीस यांनी झी मराठी वाहिनीवरील बस बाई बस कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यामध्ये त्यांनी केलेली दोन-तीन वक्तव्य सध्या चांगलीच चर्चेत आहेत. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत उत्तर दिले आहे. त्याला आता शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरेंबद्दल काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस?
बस बाई बस या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी एक प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांना नशिबान थट्टा मांडली हे गाणं ऐकवलं आणि यावेळी कोणाचा चेहरा समोर येतो असं विचारलं असता त्यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव घेतलं. यामुळे आता शिवसेना आक्रमक झाली आहे. किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीस यांना गाणं गाऊन प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?
”अशी कशी नशिबान थट्टा मांडली. एक होता निर्मळ माणूस,
देवेंद्र त्याचे नाव, मुख्यमंत्रीपदासाठी कटकारस्थान केले हो,
एका ‘अमृताची’ दृष्ट त्यांना लागली, त्यांच्या नशिबी उपमुख्यमंत्रीपद आले
अशी कशी नशिबानं थट्टा मांडली…” असं गाणं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीस यांना डिवचलं आहे.
प्लास्टिक सर्जरीच्या वक्तव्यावरुनही अमृता फडणवीस ट्रोल
बस बाई बस या कार्यक्रमात त्यांना अजून एक प्रश्न विचारला होता. तो म्हणजे तुम्ही प्लास्टिक सर्जरी केली आहे का? यावर उत्तर देताना अमृता फडणवीस म्हणाल्या ”बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला, कारण अनेकदा मला याबाबतीत अनेकांनी ट्रोल केलं आहे. प्लास्टिक सर्जरी करायला खूप हिंमत लागते. यामध्ये एक रिस्कसुद्धा आहे. की जर काही चुकलं तर तुमचा चेहराही बिघडू शकतो. लग्नाच्या आधी मी कधी ब्युटी पार्लरमध्ये गेले नव्हते. फक्त लग्नाच्या वेळेस मेक-अप केला होता”.
ADVERTISEMENT