नागपूर : अनिल परब यांना आणखी एक संधी देईन, ते वकील आहेत. त्यांनी सत्यता पडताळावी. त्यानंतर आरोप मागे नाही घेतले तर वकिलांशी बोलून त्यांच्यावर कारवाई करू, असा इशारा उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी दिला आहे. महाबळेश्वरजवळील नावली येथील गट क्रमांक – 24 मधील शेत जमिनीवर घराचे अवैध बांधकाम केल्याच्या आरोपांवर उत्तर देताना देसाई बोलत होते.
ADVERTISEMENT
काय म्हणाले शंभुराज देसाई?
देसाई म्हणाले, मी सकाळपासून विधानसभा आणि विधानपरिषदेत व्यस्त होतो. अनिल परब यांनी माझ्यावर काही आरोप केले. मी कामकाजात व्यस्त होतो म्हणून बोलू शकलो नाही. पण नावली तालुका महाबळेश्वर येथे माझी शेतजमीन आहे. २००३ साली मी शेतजमीन खरेदी केली आहे. जमीन आणि जमिनीत असणारे घर यासोबत मी खरेदी केली आहे. अनिल परब यांनी केलेला आरोप खोटा आहे.
शेतजमीन आणि घरासह असा उल्लेख मी माझ्या निवडणुकीच्या अर्जात केला आहे. मी मंत्री म्हणून आज जाहीरपणे सांगतो कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी आहे. पण मला अनिल परब यांना एवढं सांगायचे आहे मी रीतसर जमीन खरेदी केली आहे. ज्यांची स्वतःची बेकायदेशीर बांधकामे आहेत त्यांनी आरोप करू नये, असाही टोला देसाई यांनी यावेळी लगावला.
तसंच मी अनिल परब यांना एक संधी देईन. ते वकील आहेत, त्यांनी सत्यता पडताळावी. पण त्यानंतर जर त्यांनी आरोप मागे नाही घेतले तर वकिलांशी बोलून त्यांच्यावर कारवाई करू, असा इशारा देसाई यांनी दिला. तसंच मुख्यमंत्री, अब्दुल सत्तार, संजय राठोड आणि माझ्यावर आरोप केले पण एकही पुरावा नाही. शिल्लक सेनेचे आमदार त्यांच्या नेत्यांना दाखवण्यासाठी आरोप करत आहेत, त्यांना आम्ही केलेल्या उठावाचा धक्का बसला म्हणून हे शिल्लक सेनेचे अनिल परब आरोप करत आहेत, अशीही खिल्ली त्यांनी उडवली.
काय आहे नेमकं प्रकरण?
मंत्री शंभूराज देसाई यांची महाबळेश्वरजवळील नावली येथील गट क्रमांक-24 मध्ये जमीन आहे. सदर जमीन ही त्यांच्याच नावावर आहे. निवडणूक शपथपत्रात या जमिनीवर शेतजमीन आणि घर असा उल्लेख आहे. परंतु जागेच्या ७/१२ उताऱ्यावर घराच्या बांधकामाचा उल्लेख नाही, त्यामुळे हे बांधकाम अवैध असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
सदरची जमीन इकोसेन्सेटिव्ह झोनमध्ये येत असल्याने कोणत्याही बांधकामास परवानगी नव्हती. मात्र कोणत्याही परवानग्या न घेता घराचं अवैध बांधकाम केलं आहे, असा आरोप करत देसाई यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही जागा शंभुराज देसाई यांनी १० वर्षांपुर्वी खरेदी केल्याचं सांगण्यात येत आहे. तर हे घर ६ ते ७ वर्षांपूर्वी बांधल्याची प्राथमिक माहिती भालगेवाडीच्या ग्रामस्थांनी दिली आहे.
ADVERTISEMENT