राज्यातील पोलीस बदल्यांची यादी अनिल परब आपल्याकडे देत होते असा गौप्यस्फोट महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. देशमुख यांनी ईडीला दिलेल्या चार्जशीटमध्ये हा जबाब नोंदवण्यात आला आहे. अनिल देशमुख यांनी अनिल परब यांच्याबाबत केलेल्या या गौप्यस्फोटामुळे आता परब यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत.
ADVERTISEMENT
ईडीने तपासानंतर दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये अनिल देशमुख यांना एका कॅबिनेट मंत्र्याने बदल्यांसंदर्भातली यादी दिली होती असं म्हटलं आहे. याबाबत अनिल देशमुख यांना विचारलं असता ती यादी आपल्याकडे अनिल परब द्यायचे असं त्यांनी सांगितलं. अनिल परब यांनी मला यादी दिली होती आणि तिच यादी त्यांनी अतिरिक्त मुख्य सचिवांना दिली होती असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
अनिल देशमुख-सचिन वाझे कनेक्शनबद्दल ईडीच्या आरोपपत्रात काय म्हटलंय?
बदल्यांच्या संदर्भात गृह मुख्य सचिवांकडे द्यावी लागते. त्यानुसार ती दिली होती. या यादीनुसारच बदली करावी पण जे नियमात बसत असेल तेच करा नाहीतर नावं बाहेर काढा असंही तत्कालीन सचिवांना सांगितलं होतं असंही अनिल देशमुख यांनी सांगितलं. अनिल परब हे तुम्हाला यादी देत होते तर मग ते यादी कुठून आणायचे? असं विचारला असता देशमुख म्हणाले की कदाचित शिवसेनेच्या आमदारांकडून ही यादी घ्यायचे. आमदार त्यांच्या आवडत्या अधिकाऱ्यांची नावं अनिल परब यांच्याकडे देत होते आणि ती यादी तयार झाल्यानंतर माझ्याकडे अनिल परब देत असत असंही अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
अनिल परब माझ्या कामात अडथळा आणत आहेत – काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांचा आरोप
अनिल देशमुख यांच्यावर फेब्रुवारी महिन्यात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले होते. त्यातला मुख्य आरोप होता तो म्हणजे सचिन वाझेला दर महिन्याला मुंबईतल्या बार आणि रेस्तराँमधून १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा. तर दुसरा आरोप होता तो म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्या यामध्ये ढवळाढवळ करत असल्याचा. या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं. हे सगळं प्रकरण कोर्टासमोर आल्यानंतर आणि हायकोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद सोडावंही लागलं.
2 नोव्हेंबरला अनिल देशमुख ईडी समोर हजर झाले त्यानंतर त्यांची चौकशी करून उशिरा त्यांना अटक करण्यात आली. आता त्यांनी आपल्या जबाबात बदल्यांची यादी अनिल परबच आपल्याकडे द्यायचे असा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे आता पुढे काय काय घडणार हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT