भाजपचे काही लोक मला तीनवेळा भेटले. त्यांनी मला वारंवार हे सांगण्याचा प्रयत्न केला की सरकारच्या प्रवाहातून तुम्ही बाहेर पडा. आम्हाला सरकार घालवायचं आहे. त्याची तयारी आम्ही केलेली आहे. राष्ट्रपती राजवट लावायची आहे किंवा काही आमदारांना हाताशी घेऊन आम्हाला सरकार पाडायचं आहे. मी त्यांना विचारलं की हे कसं शक्य आहे? त्यांनी आम्हाला सांगितलं की जर आम्हाला मदत तुम्ही केली नाही तर केंद्रीय तपासयंत्रणा तुम्हाला टाईट करतील आणि फिक्स करतील. ठाकरे सरकारला नख लागेल असं कोणतंही कृत्य माझ्याकडून होणार नाही असंही मला सांगितलं. सध्या पवार कुटुंबांवर धाडी पडत आहेत. ते सुद्धा प्रकरण सोपं नाही आम्ही त्यांनाही टाईट करणार आहोत असंही मला सांगण्यात आलं. स्फोटक पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी हे आरोप केले आहेत.
ADVERTISEMENT
भाजपचे कोणते नेते मला भेटले ते मी सांगणार नाही. भविष्यात ती नावं सांगेन. ईडीचे लोक शरद पवार यांच्या बहिणींच्या घरात जाऊन बसले होते. मी जेव्हा त्या भाजपच्या लोकांना सांगितलं की तुम्ही असं काही करू नका. आम्ही प्रतिकार करू. ईडी आणि केंद्रीय पोलीस बल आणून सगळ्यांना थंड करू शकतो. मी नाही म्हटल्यानंतर तिसऱ्या दिवशी ईडीच्या धाडी पडायला सुरूवात झाली. मला आणि माझ्या जवळच्या लोकांना त्रास देण्यास सुरूवात झाली आहे. ईडीसह केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून आम्हाला झुकवण्याचा प्रयत्न केला जातो आहे पण आमच्यावर बाळासाहेब ठाकरेंचा संस्कार आहे. त्यांनी आम्हाला झुकायला शिकवलेलं नाही. मुलुंडचा दलाल सांगतो की ईडी संजय राऊतांच्या घरावर धाड टाकणार, असा म्हणत त्यांनी किरीट सोमय्यांवर तोफ डागली आहे. राष्ट्रपती राजवट आणली जाईल अशीही धमकी देण्यात आली होती असंही भाजपच्या लोकांनी सांगितलं. भाजपने हा नालायकपणा महाराष्ट्रात सुरू केला आहे.
अनेक लढे शिवसेना प्रमुखांच्या नेतृत्वाखाली आम्ही याच वास्तूतून लढा दिला आहे. शिवसेना भवनाने अनेक हल्ले पचवले आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आज शिवसेना प्रमुखांसोबत ज्यांनी ज्यांनी काम केलंय त्यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित आहेत. संपूर्ण शिवसेना आज इकडे उपस्थित आहेत. सगळ्यांनी मला पाठिंबाच दिलेला आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मला शुभेच्छा दिल्या आहेत.
‘संजय राऊत इशारा देतात तेव्हा…’ स्फोटक पत्रकार परिषदेबाबत काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला एक मंत्र दिला होता, तुझं मन साफ असेल, काही गुन्हा केला नसेल तर कुणाच्या बापाला घाबरू नका. आज आपले उद्धव ठाकरेही याच पद्धतीने शिवसेना पुढे घेऊन जात असतील. आज आम्हाला संदेश द्यायचा आहे की महाराष्ट्र गांडूची अवलाद नाही. मराठी माणूस बेईमान नाही. कितीही नामर्दांनी आमच्यावर वार केले तरीही शिवसेना घाबरणार नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून बदनामी केली जाते आहे. शरण या किंवा सरकार घालवू अशा धमक्या दिल्या जात आहे. 170 चं बहुमत असताना भाजप कुणाच्या भरवशावर या तारखा देत आहात? असा सवालही संजय राऊत यांनी विचारला आहे.
ADVERTISEMENT