महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत वक्तव्य केल्यानंतर आता त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तीन ट्विट करत एकनाथ शिंदे सरकारला जाब विचारला आहे. यासाठीच शिवसेना फोडून बुळबुळीत सरकार आणलं का? असाही प्रश्न संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटमध्ये एकनाथ शिंदे सरकारला विचारला आहे.भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
ADVERTISEMENT
भगतसिंह कोश्यारींच्या विरोधात काय आहेत संजय राऊत यांची ट्विट?
आता तरी..ऊठ मराठ्या ऊठ..शिवसेना फोडून बुळबुळीत सरकार का आणले याचा खुलासा भाजपा राज्यपालांनी केला आहे.. बुळबुळीत गटाचे लोक उठणार नाहीत..मराठ्या तुलाच उठावे लागेल..
थोडक्यात काय तर महाराष्ट्र व मराठी माणूस भिकारडा आहे. 105 मराठी हुतात्म्यांचा असा अपमान मोरारजी देसाई यांनी देखील केला नव्हता. मुख्यमंत्री शिंदे …ऐकताय ना. की तुमचा महाराष्ट्र वेगळा आहे..
स्वाभिमानाचा अंश उरला असेल तर आधी राज्यपालांचा राजीनामा मागा.. दिल्ली पुढे किती झुकताय?
काय ती झाडी..काय तो डोंगर..काय नदी..आणि आता…काय हा मराठी माणूस ..महाराष्ट्राचा घोर अपमान!
50 खोके वाले आता कोणत्या झाडी डोंगरात लपून बसलेत..जय महाराष्ट्र… असे ट्विट करत संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होऊ शकतो यात काहीही शंका नाही. त्यांचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होतो आहे. या व्हीडिओमध्ये त्यांनी मुंबई आणि ठाण्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
काय म्हटलं आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी?
“कधी कधी मी महाराष्ट्रातल्या लोकांना सांगत असतो की महाराष्ट्रात खासकरून मुंबई आणि ठाण्यातून गुजराथी समाजाचे आणि राजस्थानी समाजाचे लोक निघून गेले तर तुमच्याकडे कुठले पैसे उरणारच नाहीत. मुंबईला जे आर्थिक राजधानी म्हटलं जातं ते म्हटलंही जाणार नाही” असं मुंबईबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या व्हीडिओत बोलताना दिसत आहेत.
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी हा व्हीडिओ ट्विट करत आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सचिन सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, “राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर आहे. गुजराती राजस्थानी हा विषय राहू द्या यांनाच सर्वात आधी नारळ दिला पाहिजे. यांच्या कारकिर्दीत राज्यपाल या संस्थेचा आणि महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा स्तर तर खालावला आहेच, पण महाराष्ट्राचा अवमानही सातत्याने झाला आहे.”
ADVERTISEMENT