संजय राऊत आज उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची घेणार भेट

मुंबई तक

• 05:10 AM • 10 Nov 2022

शिवसेना खासदार संजय राऊत हे आज उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांचीही भेट घेणार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांची बुधवारी दुपारी कोर्टाने जामीन मंजूर करत सुटका केली. त्यानंतर संध्याकाळी ७ वाजता ऑर्थर रोड तुरुंगातून संजय राऊत बाहेर आले. संजय राऊत यांचं स्वागत तिथे जमलेल्या हजारो शिवसैनिकांनी केलं. संजय राऊत यांनी शिवसैनिकांसोबत जाऊन आधी […]

Mumbaitak
follow google news

शिवसेना खासदार संजय राऊत हे आज उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांचीही भेट घेणार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांची बुधवारी दुपारी कोर्टाने जामीन मंजूर करत सुटका केली. त्यानंतर संध्याकाळी ७ वाजता ऑर्थर रोड तुरुंगातून संजय राऊत बाहेर आले. संजय राऊत यांचं स्वागत तिथे जमलेल्या हजारो शिवसैनिकांनी केलं. संजय राऊत यांनी शिवसैनिकांसोबत जाऊन आधी सिद्धिविनायक आणि त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या समाधीचं दर्शन घेतलं. आज संजय राऊत हे फोर्टिस रूग्णालयात मेडिकल चेक अप साठी जाणार आहेत. त्यानंतर ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

हे वाचलं का?

संजय राऊत हे महाविकास आघाडीचे शिल्पकार

राज्यात अडीच वर्षांपूर्वी न भुतो न भविष्यती असा जो महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यात आला त्याचे दोन शिल्पकार होते. एक होते शरद पवार आणि दुसरे होते संजय राऊत. महाविकास आघाडीच्या प्रयोगात या दोघांचा सिंहाचा वाटा आहे. अशात संजय राऊत हे शिवसेनेची बाजू लावून धरत होते. विरोधकांवर त्यांनी विविध आरोप आणि टीकाही केली. त्यानंतर तीन महिन्यांपूर्वी ३१ जुलैच्या दिवशी संजय राऊत यांना अटक करण्यात आली. पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात ही अटक केली गेली होती. मात्र PMLA कोर्टाने बुधवारी संजय राऊत यांना जामीन मंजूर केला.

संजय राऊत हे जेव्हा त्यांच्या भांडूप येथील निवासस्थानी पोहचले त्यावेळीही त्यांच्यासोबत अनेक शिवसैनिक होते. त्यांनी त्या ठिकाणी एक छोटेखानी भाषणही केलं. मला अटक करून खूप मोठी चूक केली गेली आहे असंही वक्तव्य संजय राऊत यांनी बुधवारी केलं.

काय म्हटलं आहे संजय राऊत यांनी?

आज घरी आल्यानंतर मला वाटलं की शिवतीर्थावरच आलो. दसरा मेळावा चुकला होता. मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. १०० दिवसांनंतरही तुम्ही माझं स्मरण ठेवलंत मी तुमचा आभारी आहे. १०० दिवसांनी मी घरी आलो आहे. माझ्या सुटकेनंतर मी पाहिलं की फक्त भांडुप किंवा मुंबईत नाही तर महाराष्ट्रातल्या शिवसैनकांमध्ये आनंद झाला आहे. बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक कसा असतो हे महाराष्ट्राने आणि देशानं पाहिलं. याच रस्त्यावरून मला अटक करून घेऊन गेले होते. तेव्हाही तुम्ही जमला होतात. तेव्हाही मी जाताना सांगितलं होतं की मरण पत्करेन पण शरण जाणार नाही.

मला कितीही वेळा अटक करा मी भगवा सोडणार नाही

मला कितीही वेळा अटक करा मी शिवसेनेला त्यागणार नाही. हा भगवा सोडणार नाही. हा भगवा घेऊन मी जन्माला आलो, त्या भगव्यासोबतच मी जाईन. या महाराष्ट्रात आता आपल्या शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल. माझ्या अटकेच्या आधी दिल्लीतून आदेश आले की इसको जेलमें डालो फिर सरकार आयेगी. आता खोक्यांची गोष्ट चालली आहे. महाराष्ट्रातले बोके खोक्यांवर बसली आहे. मात्र शिवसेना त्यांना काय ते दाखवून देईल. शिवसेना फक्त बाळासाहेब ठाकरेंचीच. गद्दारांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायचा अधिकार नाही. मुंबई महापालिका आपल्या हातातून काढून घेण्यासाठी शिवसेना फोडली आहे लक्षात घ्या. असंही संजय राऊत म्हणाले.

    follow whatsapp