भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या दापोली दौऱ्यामुळे आज कोकणातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. दापोली येथील परिवहनमंत्री अनिल परब यांच्या वादग्रस्त रिसॉर्टवर कारवाई करण्यासाठी किरीट सोमय्या प्रतिकात्मक हातोडा घेऊन दापोलीत दाखल झाले आहेत. यानिमीत्ताने महाविकास आघाडी विरुद्ध भाजप कार्यकर्त्यांमध्ये आज दापोलीत चांगलीच घोषणाबाजी पहायला मिळते आहे. सोमय्यांच्या या दौऱ्यावर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी टीका केली आहे.
ADVERTISEMENT
किरीट सोमय्यांना हातात हातोडा घेऊ द्या, फावडं घेऊ द्या किंवा मग कुदळ घेऊ द्या. आम्ही शिवरायांचे मर्द मराठे शिवसैनिक आहोत. आम्ही घाबरणार नाही. शिवरायांचा मर्द मावळा हा दिल्लीच्या तख्तापुढे झुकणार नाही तो लढतही राहील आणि जिंकतही राहिल असं विनायक राऊत म्हणाले ते कोल्हापूर दौऱ्यावर पत्रकारांशी बोलत होते.
निलेश आणि नितेश राणे यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता राऊत यांनी राणेंचा विषय आमच्यासाठी संपलेलं गणित असल्याचंही राऊतांनी स्पष्ट केलं. यावेळी राऊतांनी भाजपच्या दुटप्पी धोरणावर सडकून टीका केली. बेळगावसह निपाणी कारवार येथील सीमाभागात मराठी जनतेवर अत्याचार सुरू आहे आणि महाराष्ट्रातील भाजप नेते मूग गिळून गप्प बसले असल्याचं राऊत म्हणाले.
विधानसभेत आम्ही केलेला निषेधाचा ठराव हा योग्यच आहे. आम्ही देखील संसदेत याबाबत पत्र दिले त्यावेळी भाजपने त्यावर सही करण्यास नकार दिला. यावरून भाजपचे सीमाभागातील मराठी माणसाबाबत दुट्टपी धोरण दिसून येते, असं विनायक राऊत म्हणाले.
ADVERTISEMENT