महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना आणि विरोधी पक्षातील भाजप यांच्यातल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अजुनही थांबण्याचं नाव घेत नाहीये. देशात गेल्या काही दिवसांपासून काही ठराविक नेत्यांना केंद्र सरकारने Y आणि Z दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवल्याच्या घटनांवर शिवसेनेने आजच्या सामना अग्रलेखातून बोट ठेवलं आहे. मोदी-शहांच्या राज्यात असं का व्हावं? लोकांना भयमुक्त आणि शांततापूर्ण वातावरणात का जगता येऊ नये? सरसकट होलसेलच्या भावात सुरक्षा व्यवस्था पुरवण्याची वेळ भाजपवर का यावी? असे प्रश्न आजच्या अग्रलेखातून शिवसेनेने विचारले आहेत.
ADVERTISEMENT
इतकच नव्हे तर भाजपचा अजेंडा न्यायालय आणि तपासयंत्रणात रेटून नेणाऱ्या लोकांना Y दर्जाची सुरक्षाव्यवस्था पुरवून अशा Y वाल्यांची फौज उभी करुन देशात भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचंही शिवसेनेने म्हटलं आहे.
हिजाबवर निकाल देणारे कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, काश्मिर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री, महाराष्ट्रविरोधी बेताल वक्तव्य करणारी नटी कंगना रणौत, आम आदमीचे पूर्वाश्रमीचे नेते कुमार विश्वास यांना केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांमध्ये विविध कारणांसाठी Y दर्जाची सुरक्षाव्यवस्था पुरवली. याव्यतिरीक्त राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर चिखलफेकीचं कंत्राट घेणाऱ्या किरीट सोमय्यांनाही Z सुरक्षाव्यवस्था देऊन केंद्राने उपकृत केलं आहे. नारायण राणेंनाही अशीच सुरक्षा व्यवस्था मिळाली आहे. पश्चिम बंगालमध्येही ममता बॅनर्जींविरोधात गरळ ओकणाऱ्यांना केंद्राने चणे-कुरमुरे वाटावे तशी सुरक्षा व्यवस्था पुरवल्याचं शिवसेनेने म्हटलं आहे.
दुसरीकडे परखडपणे सत्य मांडणाऱ्या लोकांना भाजपचे अंधभक्त घरात घुसून मारण्याच्या धमक्या देत आहेत. आशुतोष यांच्यासारख्या पत्रकाराचा काटा काढण्याचं कारस्थान जर काही अंधभक्तांनी केलं असेल तर मग त्यांच्या जिवीताचं रक्षण कोणी करायचं असा प्रश्न शिवसेनेने भाजपला विचारला आहे. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून देशातील वातावरण मोकळे आणि भयमुक्त होईल असं वाटत होतं. उत्तर प्रदेशात एमआयएमचे प्रमुख ओवैसींवर झालेला हल्ला आणि त्यानंतर केंद्राने त्यांना Z दर्जाची सुरक्षा देण्याची केलेली घोषणा ही मिलीजुली योजनाच असायला हवी असा आरोप आजच्या अग्रलेखातून शिवसेनेने केला आहे.
ADVERTISEMENT