मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुंबई उच्च न्यायालयाने शिवाजी पार्कवरती दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली. मुंबई महापालिकेचा दोन्ही गटांना मैदान न देण्याचा निर्णय रद्द करुन न्यायालयाने ठाकरे गटाला शिवाजी पार्कचे मैदान उपलब्ध करुन दिले. न्यायालयाच्या निकालानंतर राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये जल्लोष सुरु आहे. ठिकठिकाणी फटाके फोडून, पेढे वाटून सेलिब्रेशन केले जात आहे.
ADVERTISEMENT
मात्र उच्च न्यायालयाच्या निकालानंतरही ठाकरे यांना घेरण्यासाठी सध्या शिंदे गटाकडून रणनीती आखली जात आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावस्कर यांनी आपल्यालाही शिवतीर्थावर मेळावा घेता आला पाहिजे अशी कार्यकर्त्यांची भावाना असल्याचे सांगत ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयात घेरणार असल्याचे संकेत दिले. आज शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर यांनीही उच्च न्यायालयाच्या वर सर्वोच्च न्यायालयात असते, असे म्हणून उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार असल्याचे संकेत दिले आहेत.
किरण पावस्कर काय म्हणाले?
उच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्याबाबत अजून स्पष्टता आलेली नाही. पण पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना एक सूर लक्षात आला की आपल्यालाही शिवतीर्थावर आपला मेळावा साजरा करता आला पाहिजे. त्यामुळे उच्च न्यायालयाचा आदर करुन त्या निर्णयाविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात का जावू नये? निर्णय कोणत्या कारणाने देण्यात आला? आमचा अर्ज का नाकारला? या प्रश्नांचा उहापोह होणे गरजेचे आहे.
याबाबत आम्ही आमची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळवणार आहोत आणि कधी जायचं याचा पुढील निर्णय सर्वस्वी ते घेणार आहेत. पण सर्वोच्च न्यायालयात जाणार हे नक्की आहे. मात्र जरी उच्च न्यायालयाचा, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला तरीही होणारा मेळावा हा शिवसैनिकांचा आहे आणि जिथे शिवसैनिक जमतील ते शिवतीर्थ. पण एका चांगल्या विचारांचा एक गरज आहे, बाळासाहेबांच्या विचारांची गरज आहे. म्हणून हा मेळावा महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांना घेऊन होणार आहे, उत्साहात होणार आहे, हे नक्की आहे, असेही पावस्कर म्हणाले.
काय म्हणाले दीपक केसरकर?
दीपक केसरकर म्हणाले, कोर्टाचा निर्णय सर्वांनी मान्य करायचा असतो. पण हायकोर्टाच्या वर सुप्रिम कोर्टही असते. त्यामुळे सुप्रिम कोर्टात जायचं की नाही त्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही परवानगी शिवसेना म्हणून दिलेली नाही, तर त्यांनी पहिला अर्ज केला होता, सोबतच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची हमी यावर परवानगी दिली आहे.
त्यादिवशी तिथे आरक्षित जागा शिवसेनेचा दसरा मेळावा यासाठी आहे. पण शिवसेना कोणाची हा मुद्दा सध्या कोर्टात आहे. ती केस चालू आहे. त्यांचा अर्ज पहिल्यांदा होता यावरच त्यांना परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आथा पुढे काय करायचे याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे घेतील, असे म्हणतं केसरकर यांनी पुन्हा एकदा सुप्रिम कोर्टात जाण्याचे संकेत दिले.
ADVERTISEMENT