काँग्रेस नेते जितीन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवसेनेने आज पुन्हा एकदा सामना या अग्रलेखातून काँग्रेस नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. अहमद पटेल, राजीव सातव यांच्या निधनानंतर पक्षात पोकळी निर्माण झाली आहे अशातच काही तरुण नेते भाजपचा मार्ग स्वीकारत आहेत हे बरं नाही. सोनिया गांधींनी आतापर्यंत काँग्रेस पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळली आहे. आता राहुल गांधी यांनाही पक्षात एक मजबुत टीम तयार करावीच लागेल असं म्हणत शिवसेनेने काँग्रेस नेतृत्वाला सल्ला दिला आहे.
ADVERTISEMENT
शेवटचे शिलेदारही उड्या मारायला लागले आहेत –
जितीन प्रसार यांना काँग्रेसमध्ये घेण्यात ब्राम्हण मतांची बेरीज आहे असं बोललं जातंय. आतापर्यंत उत्तर प्रदेशात कोणत्याही गणिताची व चेहऱ्याची भाजपला गरज लागली नाही. नरेंद्र मोदी सब कुछ असं त्यांचं धोरण होतं. अशावेळी भाजपला आता ब्राम्हण मतांसाठी जितीन प्रसाद यांचा आधार घ्यावा लागतोय. जितीन प्रसार काँग्रेसमध्ये होते तेव्हा काँग्रेसला फायदा झाला नाही आता भाजपमध्ये गेल्यावर त्यांनाही उपयोग नाही. प्रश्न हा नसून काँग्रेसमधले शेवटचे शिलेदारही आता नौकेवरुन टणाटण उड्या मारायला लागले आहेत.
हे उत्तर प्रदेशातच घडतंय असं नाही. राजस्थानमध्ये सचिन पायलट यांनी पक्ष नेतृत्वाला निर्वाणीचा इशारा दिला आहे. पायलट आणि त्यांचे समर्थक कधीपासून निराश आहेत, त्यांचा एक पाय बाहेर आहेच. वर्षभरापूर्वी त्यांचं बंड शमवण्यात काँग्रेसला यश आलं. तिकडे पंजाबमध्येही कॅप्टन अमरिंदर यांच्याविरोधातील गटाने आरपारची लढाई सुरु केली असताना जितीन प्रसाद यांसारखे नेते सोडून जाणं हे चिंतेची बाब वाटते.
भाजपमध्येही बंडाळ्या पण त्यांना निवडणूक जिंकण्याचं तंत्र अवगत –
यावेळी अग्रलेखात संजय राऊत यांनी, भाजप पक्षालाही अंतर्गत बंडाळ्यांचा सामना करावा लागतो आहे. पश्चिम बंगालमध्ये पराभव झाल्यानंतर उधारीवर घेतलेले नेते आता तृणमूल पक्षात परतत आहेत. सुवेंदू अधिकारी यांच्याविरोधात मुकुल रॉय यांनी बंड केलंय. उत्तर प्रदेशात मोदी विरुद्ध योगी असा सुप्त संघर्ष सुरु आहे. असं असलं तरीही मोदी-शहा-नड्डा यांचं नेतृत्व मजबूत आहे. भाजपचं पक्ष संघटन जमिनीवर आहे. जुने नेते गेले तरी नवे नेते तयार करण्याची क्षमता त्यांच्यात आहे.
निवडणुका जिंकण्याचं तंत्र त्यांनी अवगत केलंय. उत्तर प्रदेशातल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने अनुपचंद्र पांडे यांची निवडणुक आयुक्त म्हणून नेमणूक केली. पांडे हे आधी उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव होते. जितीन प्रसाद, सचिन पायलट, ज्योतिरादित्य शिंदे या तरुण नेत्यांकडून अपेक्षा होत्या आणि याच नेत्यांनी भाजपचा मार्ग स्वीकारला….हे बरं नाही. काँग्रेस हा जनमानसात मुळे घट्ट रुजलेला पक्ष आहे. त्यामुळे त्या पद्धतीने सोनिया गांधींनी पक्षाची धुरा सांभाळली त्याचप्रमाणे राहुल गांधी यांनाही भविष्यात मजूत टीम तयार करावी लागेल, हेच काँग्रेसच्या प्रश्नचिन्हाचं उत्तर ठरू शकेल असं संजय राऊत यांनी अग्रलेखात म्हणलंय.
ADVERTISEMENT