माझ्या पक्षाचं नाव गोठवलं, चिन्ह गोठवलं आणि निवडणुकीच्या रिंगणातून पळ काढला. आपल्याला मनस्ताप द्यायचा, त्रास द्यायचा, शिवसेना संपवायची या हेतूने सगळं करण्यात आलं असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी केला आहे. शिंदे गट आणि भाजपवर त्यांनी आरोप केला आहे. आज बुलढाण्यातील शिवसैनिकांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरेंनी आणखी काय म्हटलं आहे?
उद्धव ठाकरेंनी यावेळी महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली. लवकरच मी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. आगामी काही दिवसांमध्ये मी बुलढाण्यातही येणार आहे आणि तिथे सभा घेणार आहे असंही उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं. तसंच आज त्यांनी आपण लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचंही जाहीर केलं. या दौऱ्यात संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहे असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.
राजन साळवी यांचं कौतुक
राजन साळवींना गद्दारांनी अनेक आमिषं दाखवली. मात्र राजन साळवी हे कोणत्याही आमिषाला बळी पडले नाहीत. खंबीरपणे ते आपल्यासोबत आहेत. गद्दारांनी आपल्याशी गद्दारी केली. मात्र त्यांच्या छाताडावर नाचून आपण भगवा फडकवू असाही विश्वास यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
बुलढाण्यातल्या शिवसैनिकांनी दिल्या घोषणा
यावेळी बुलढाण्यातल्या शिवसैनिकांनी घोषणा दिल्या. झुकेंगे नाही लडेंगे उद्धव ठाकरेंचा विजय असो. शिवसेनेचा विजय असो. जय भवानी-जय शिवाजी या घोषणाही यावेळी देण्यात आल्या.
शिवसेनेचं चिन्ह आणि नाव गोठवलं तरीही मशाल घेऊन पुढे जाऊ
शिवसेनेचं चिन्ह आणि नाव गोठवलं तरीही मशाल घेऊन आपण पुढे जाऊ असा विश्वास यावेळी उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं तरी मशाल घेऊन आपण पुढे जात होतो. धनुष्यबाण रामाचा होता, त्या धनुष्यबाणाच्या मदतीनेच रावणाचा वध रामाने केला. आता अन्यायाला जाळणारी आणि अंधारात वाट दाखवणारी मशाल आपल्याकडे आहे ती घेऊन पुढे जात काम करू असंही आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.
अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपची माघार
अंधेरीची पूर्व भागातली पोटनिवडणूक ३ नोव्हेंबरला पार पडणार आहे.यासाठी भाजपच्या मुरजी पटेल यांनी अर्ज भरला होता. मात्र सोमवारी म्हणजेच अर्ज मागे घेण्याच्या दिवशी मुरजी पटेल यांनी अर्ज मागे घेतला. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे. अशात आता भाजपने जो अर्ज मागे घेतला आहे त्यावर उद्धव ठाकरेंनी टोला लगावला आहे.
ADVERTISEMENT