मुंबई : आणीबाणीच्या काळात काँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांनी शिवसेनेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे दिला होता. तेव्हा काँग्रेसचा आणि आपला काही संबंध नव्हता. मात्र त्याकाळात जे काम काँग्रेसने केले नाही, ते आज तुम्ही करत आहात. मग गुन्हेगार कोण? तुम्ही की काँग्रेस? असा सवाल शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांना विचारला. शिवसेनेचे नाव आणि पक्ष चिन्ह गोठवल्यानंतर ते पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले होते.
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे म्हणाले, आज जे काही चाललं आहे, ते फार विचित्र आहे. मी दसरा मेळाव्यात पण याचा उल्लेख केला. शिवसैनिकांना दमदाट्या सुरु आहेत. म्हणजे आणीबाणाीच्या काळात जे इंदिरा गांधींनी केले नव्हते, ते तुम्ही केलेत. शिवसेनेवर बंदी घाला ही मागणी त्यावेळी काही स्थानिक नेत्यांनी इंदिरा गांधी यांच्याकडे केली होती. पण त्यांनी सगळं बघितल्यानंतर शिवसेनेवर बंदी घालायची नाही असं सांगितलं.
याचा अर्थ असा नाही की शिवसैनिकांना त्रास झाला नाही. स्थानबद्धता, तडीपाऱ्या, खटले दाखल केले जाणे या गोष्टी चालू होत्या. पण तेव्हा सरकार काँग्रेसचे होते. आज जे बोंबलत आहात, तुम्ही काँग्रेस सोबत गेल्यावर हिंदुत्व सोडलं. तेव्हा तर काँग्रेस आणि आपला काहीही संबंध नव्हता. पण काँग्रेसने कधीही शिवसेनेवर बंदी घालण्याचा विचार केला नव्हता. आज तुम्ही ज्यांच्यासोबत गेला आहात, तुमचा हेतू आता स्पष्ट झालेला आहे, तो हेतू शिवसेना संपविण्याचा आहे. मग जे काँग्रेसने केले नाही ते तुम्ही करत आहात. मग गुन्हेगार कोण आहे? काँग्रेस की तुम्ही? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी विचारला.
उपयोग संपल्यावर फेकून दिले जाईल :
उपयोग संपला की शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या ४० आमदार, १२ खासदारांना फेकून दिले जाईल, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या एक सरबताच्या जाहिरातीचा संदर्भ देऊन उद्धव ठाकरे म्हणाले, ज्याप्रमाणे सरबतची बाटली आपण घरी आणतो, त्यात सरबत असे पर्यंत आपण ती अतिशय जपून वापरतो. मात्र त्यातील सरबत संपता क्षणी ती फेकून दिली जाते. यांच्यासोबतही असेच होईल. यांचा उपयोग ज्या क्षणी संपेल त्याक्षणी यांना फेकुन दिले जाईल.
उद्धव ठाकरेंचा भाजपवरही निशाणा :
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, उलट्या काळजाची काही माणसं आणि त्यांचे कंपू फिरतात, त्यांचा राग येतो. पण वाईट वाटतं की, ज्या शिवसेनेनं तुम्हाला राजकीय जन्म दिला, जी शिवसेना तुमची राजकीय आई आहे. त्याच आईच्या काळजात कट्यार घुसवली. शिवसेना हे पवित्र नाव गोठवलं. शिवसेनेचं पवित्र चिन्ह गोठवलं. त्यांना आता आनंदानं उकळ्या फुटत असतील.
पण त्याहीपेक्षा त्यांच्या मागे जी महाशक्ती आहे, तिला जास्त आनंद होत असेल. बघा आम्ही करुन दाखवलं. जे आम्हाला जमलं नाही, ते त्यांचीच माणसं फोडून त्यांच्याच माध्यमातून करुन दाखवलं. कशी ही माणसं काय? मिळवलं तुम्ही? ज्या शिवसेनेनं मराठी माणसाला आधार दिला, ज्या शिवसेनेनं मराठी मन पेटवली आणि हिंदु आस्मिता जपली, त्या शिवसेनेचा घात तुम्ही करायला निघाला आहात, ते शिवसेना हे पवित्र नाव तुम्ही गोठवलं, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
ADVERTISEMENT