शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदीन सोहळ्यात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसैनिकांशी संवाद साधला. या कार्यक्रमात बोलत असताना उद्धव ठाकरेंनी स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसला टोला लगावत भाजपलाही चिमटे काढले.
ADVERTISEMENT
सत्तेसाठी शिवसेना कधीही लाचार होणार नाही. उगाचच कोणाचीतरी पालखी आम्ही वाहणार नाही, आमचा जन्म हा पालखी वाहण्यासाठी झालेला नाही. पायात फाटके जोडे असले तरीही चालतील पण आम्ही स्वाभिमानाने चालू असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं.
स्वबळाबद्दल बोलत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बंगालचं उदाहरण दिलं. “बंगालने खऱ्या अर्थाने स्वबळाचा अर्थ दाखवून दिला. ममता दीदींनी बंगालची ताकद दाखवून दिली. राजकारण आता वळत चाललं आहे, राजकारणाचं विकृतीकरण सुरु आहे. शिवसैनिकांवर टीका होत असतात. परंतू नुसतं हाणामारी करणं ही शिवसेनेची आणि शिवसैनिकांची ओळख नाही. ५५ वर्षांची वाटचाल ही सोपी नाही, शिवसेना अजुनही पुढे जात आहे.”
महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला कमी महत्व मिळत असल्यामुळे नेत्यांची नाराजी गेल्या काही दिवसांमध्ये समोर आली होती. त्यामुळे काँग्रेसच्या या स्वबळाच्या नाऱ्याचा मुख्यमंत्र्यांनी आजच्या भाषणात समाचार घेतला. “सध्याच्या परिस्थितीत संकुचित राजकारण केल्यास त्याचा कोणालाही फायदा होणार नाही. काहीजणांना आपण स्वबळावर लढू आणि सरकारला अडचणीत आणू असं वाटत असेल तर ते होणार नाही. आता लोकांसमोर स्वबळाची भाषा करायला गेलात तर ते चपलेने मारतील. सत्ता आणि स्वबळ बाजूला ठेवत सध्या सर्वांनी कोरोनाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात सांगितलं.
ADVERTISEMENT