Balasahebanchi Shivsena Symbol : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ढाल तलवार या चिन्हावर नांदेडच्या शीख बांधवांनी आक्षेप घेतला आहे. सचखंड गुरूद्वारा बोर्डाचे माजी सचिव रंजीत सिंह कामठेकर यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं आहे. त्रिशूळ हे धार्मिक चिन्ह असल्या कारणाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ते नाकारलं गेलं याच प्रमाणे तलवार हेदेखील खालसा पंथाचं धार्मिक प्रतीक आहे. त्यामुळे हे चिन्ह निवडणूक आयोगाने द्यायला नको होतं असंही शीख समुदायाने म्हटलं आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या चिन्हाचं काय होणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
ADVERTISEMENT
शीख समुदायाच्या पत्रामुळे नवा वाद?
निवडणूक आयोगापुढे चिन्हाचे जे पर्याय देण्यात आले होते त्यात उगवता सूर्य, पिंपळाचं झाड आणि ढाल तलवार तीन चिन्हांचा समावेश होता. त्यापैकी ढाल-तलवार हे चिन्ह शिंदे गटाला मिळालं. त्यानंतर आता शीख समुदायाने या चिन्हाला विरोध दर्शवला आहे. उगवता सूर्य हे तामिळनाडूतील मिझोरम नॅशनल पक्षाचं चिन्ह असल्यानं ते नाकारण्यात आलं तसंच पिंपळाचं झाड हे चिन्हंही नाकारण्यात आलं आणि ढाल तलवार चिन्ह देण्यात आलं होतं. आता यावरून नवा वाद निर्माण झाला आहे.
निवडणूक आयोगानं अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गट आणि शिंदे गटाला पक्षचिन्ह आणि पक्षाची नावं दिली आहेत. शिवसेना हे नाव वारण्यास दोन्ही गटांना बंदी घालण्यात आली आहे. तर, शिवसेनेचं चिन्ह असलेलं धनुष्यबाणही हे चिन्हही गोठवण्यात आलं आहे. यात निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आलं आहे. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव देण्यात आलं आहे. तर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिलं होतं. तर शिंदे गटाला दुसऱ्या तीन चिन्हांचा पर्याय देण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर शिंदे गटाकडून ढाल-तलवार, उगवता सूर्य आणि पिंपळाचं झाड अशी तीन चिन्हं देण्यात आली होती. त्यातील ढाल-तलवार हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला देण्यात आलं. मात्र आता शीख समुदायाने पत्र लिहून हे या चिन्हावर आक्षेप घेतला आहे.
ADVERTISEMENT