हजारो अनाथांना मायेची उब देणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचं मंगळवारी पुण्यात निधन झालं. सिंधुताई सपकाळ यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. प्रकृती सुधारत असतानाच त्यांच्या फुफ्फुसाला संसर्ग झाला होता. त्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. सिंधुताई सपकाळ यांच्या निधनानंतर रुग्णालयाकडून सविस्तर माहिती देण्यात आली.
ADVERTISEMENT
सिंधुताई सपकाळ यांचं निधन झाल्याची माहिती गॅलक्सी रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली. त्यासंदर्भात मेडिकल बुलेटीनही जारी करण्यात आलं. “पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचं मंगळवारी रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. माई 25 नोव्हेंबर रोजी 2021 हर्नियाचा त्रास होत असल्यानं दाखल झाल्या होत्या. सुरुवातीला त्यांची प्रकृती चांगली सुधारली. काही कारणाने फुफ्फुसाला जंतूसंसर्ग झाला आणि त्यांची ऑक्सिजनची पातळी खाली जाण्यास सुरूवात झाली”, अशी माहिती गॅलक्सी केअर मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचे डॉ. भूषण किन्होळकर यांनी दिली.
‘चिंधी’ची सिंधुताई झाली अन् हजारो अनाथांना माय मिळाली; असा होता माईंचा संघर्ष
“मागील सात ते आठ दिवसांपासून त्या आयसीयूमध्ये होत्या. आमचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते, पण दुर्दैवाने त्यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं”, असं डॉ. किन्होळकर म्हणाले.
सिंधुताई सपकाळ यांना झालेल्या आजाराबद्दलही डॉक्टरांनी माहिती दिली. “डायाफ्रामॅटिक हर्निया म्हणजे पोटातील जे अवयव असतात ते फुफ्फुसामध्ये घसरतात. त्यामुळे पचनाला त्रास होतो. माईंना हा त्रास मागच्या 7 ते 8 वर्षांपासून होता. त्यामुळे उलट्या व्हायच्या. काही वेळेस रक्ताच्या उलट्याही झाल्या होत्या. त्यामुळे माईंच्या संमतीनेच शस्त्रक्रिया करण्याचं ठरवलं होतं.”
अनाथांसाठी आभाळाएवढं कार्य करणाऱ्या सिंधुताई!
“माईंवर शस्त्रक्रियाही व्यवस्थित झाली. त्यानंतर पुढचे 15 ते 20 दिवस त्यांची प्रकृती चांगली साथ देत होती. आम्ही डिस्चार्ज देण्याचा विचार करत असतानाच अचानक जंतूसंसर्ग सुरू झाला. त्यामुळे माईंना आम्हाला आयसीयूमध्ये भरती करावं लागलं. मागील 7 ते 8 दिवसांपासून आमचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. डॉ. शैलेश पुणतांबेकरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सर्व उपचार सुरू होते, पण दुर्दैवाने त्या आपल्यामध्ये नाहीत,” असं डॉ. किन्होळकर यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT