संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांचं मुंबईत निधन झालं आहे. मुंबईतल्या रूग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. PTI या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे. संगीतकार बप्पी लहरी हे त्यांच्या संगीतासाठी आणि गाण्यांसाठी जेवढे प्रसिद्ध होते तेवढेच त्यांच्या गोल्डन अवतारासाठीही. खास प्रकाराचे सूट त्यावर सोन्याच्या चेन, काळा गॉगल हा त्यांचा लुक खास प्रसिद्ध होता. बॉलिवूडला डिस्को आणि पॉप संगीताची ओळख करून देणारा हा कलाकार आता काळाच्या पडद्याआड गेला आहे.
ADVERTISEMENT
बप्पी लाहिरी यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952 ला पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी मध्ये झाला होता. 2021 मध्ये त्यांना कोरोनाही झाला होता. मात्र कोरोनावर त्यांनी यशस्वीरित्या मात केली. तम्मा तम्मा लोगे, डिस्को डान्सर, याद आ रहा है.. तेरा प्यार ही आणि यासारखी अनेक सुपरहिट गाणी बप्पीदांनी गायली आहेत. बप्पी लाहिरी यांचं मूळ नाव आलोकेश लाहिरी असं होतं.
१९७३ साली प्रदर्शित झालेल्या ‘नन्हा शिकारी’ या चित्रपटाला संगित देत त्यांनी करिअरची सुरुवात केली. मात्र १९७६ साली आलेल्या ‘चलते-चलते’ या चित्रपटामुळे त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. हा चित्रपट फारसा गाजला नाही. मात्र बप्पीदांची गाणी मात्र तुफान गाजली. त्यानंतर त्यांची लोकप्रियता वाढू लागली. विशेष म्हणजे त्यांच्या लोकप्रियतेसोबतच त्यांच्या सोन्याचा दागिन्यांचीही चर्चा होऊ लागली.
बप्पीदा सोन्याचे दागिने का घालत?
तुम्ही एवढे सोन्याचे दागिने का घालता? असा प्रश्न त्यांना एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना, हॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आणि अभिनेता एल्विस प्रेस्ली हा माझा आवडता कलाकार असून तो कायम सोन्याची चेन घालतो. त्याला पाहून मला कायम प्रेरणा मिळत राहिली. इतकंच नाही तर, जर मी जीवनात यशस्वी झालो तर माझी एक स्वतंत्र ओळख निर्माण करेन असं ठरवलं होतं. त्यातच मला असं वाटतं की सोनं माझ्यासाठी लकी आहे. त्यामुळेच मी कायम सोनं घालतो आणि त्यामुळेच गाण्यासोबत माझी वेगळी ओळखही झाली आहे, असं बप्पीदांनी सांगितलं होतं. आज बॉलिवूडचा हा सोनेरी आवाज काळाच्या पडद्याआड गेला आहे.
ADVERTISEMENT