नियंत्रण सुटलेल्या बसची वाहनांना धडक लागून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जण ठार तर १२ जण जखमी झाली आहे. कानपूरमध्ये रात्री उशिरा ही घटना घडली आहे. या घटनेतील जखमींना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कानपूरच्या टाटा मिल चौकात या इ बसचे नियंत्रण सुटलं आणि ती एका मागोमाग एक अशा 17 वाहनांना जाऊन धडकली.
ADVERTISEMENT
कानपूरच्या घंटाघर येथून टाटा मिल या ठिकाणी ही बस जात होती. त्यावेळी चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. ड्रायव्हर घटनास्थळावरून पळून गेला आहे. इ बसची जबाबदारी आणि देखभाल करणाऱ्या पीएमआय या एजन्सीने याबाबत स्पष्टीकरण मागितलं आहे.
हॅरिसगंज रेल्वे पुलावरून उतरल्यानंतर या बसने कृष्णा रूग्णालयाजवळून राँग साईडने धावण्यास सुरूवात केली. त्यात बसने 2 कार, 10 दुचाकी, 2 ई रिक्षा आणि 3 टेम्पोला धडक दिली. या घटनेमुळे रस्त्यावर एकच गोंधळ उडाला. टाटा मिल या ठिकाणी डंपरलाही बसने जोरदार धडक दिली. त्यानंतर बस ड्रायव्हर पळून गेला. या घटनेत सहा जण ठार झाले आहेत तर बारा जण जखमी झाले आहेत.
मृत्यू झालेल्यांपैकी तिघांची ओळख पटली आहे. तर इतरांच्या नातेवाईकांचा शोध घेतला जातो आहे. शुभम सोनकर, ट्विंकल सोनकर, अरसलान यांची ओळख पटली आहे. या अपघातात जे जखमी झाले आहेत त्यांच्या कृष्णा हॉस्पिटल आणि हॅलट हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनेची दखल घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
ADVERTISEMENT