मुंबई: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी उत्तर भारतातील राजकारणाविषयी केलेल्या वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री आणि अमेठीच्या खासदार स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर थेट हल्ला केला आहे. ‘एहसान फरामोश’ असं ट्विट करत स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. तसंच यामुळे आता उत्तर विरुद्ध दक्षिण अशा राजकारणाला सुरुवात झाली आहे. यावेळी स्मृती इराणी यांनी असंही म्हटलं आहे की, ज्या उत्तर भारतावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे त्यांना लक्षात असू दे की, सोनिया गांधी या उत्तरेतीलच खासदार आहेत.
ADVERTISEMENT
‘एहसान फरामोश’ असं ट्विट केल्यानंतर स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर चौफर टीका केली. स्मृती इराणी यांनी असं म्हटलं आहे की, ‘जर त्यांना उत्तर भारताच्या लोकांबाबत हीन भावना आहे तर हे उत्तर भारतात राजकारण का करत आहेत? प्रियंका वाड्रा यांनी आतापर्यंत राहुल गांधींच्या वक्तव्याचं खंडन का केलं नाही? गांधी कुटुंबीय जेव्हा अमेठीला परतील तेव्हा त्यांना या गोष्टीचं उत्तर नक्की द्यावं लागेल.’
त्या पुढे असंही म्हणाल्या की, ‘राहुल गांधी अमेठीमध्ये परत येवोत अथवा न येवो पण ते उत्तर भारताच्या लोकांचा अपमान करु शकत नाहीत. राहुल गांधी यांच्या बुद्धीमत्तेवर काँग्रेस नेत्यांचा किती विश्वास आहे हे पुद्दुचेरीमध्ये सगळ्यांनी पाहिलं.’
ही बातमी नक्की वाचा: मोदी सरकारने देशाचं आणि घराचं बजेट बिघडवलं-राहुल गांधी
राहुल गांधी यांनी नेमकं काय वक्तव्य केलं होतं?
तिरुवनंतपुरम येथे एका सभेला संबोधित करताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी असं म्हटलं होतं की, ‘पहिल्या 15 वर्षासाठी मी उत्तरेचा (उत्तर भारत) खासदार होतो. मला एका वेगळ्या प्रकारच्या राजकारणाची सवय झाली होती. माझ्यासाठी केरळला येणे खूपच स्फूर्तिदायक होते कारण मला असे आढळले की लोक विषयांवर आणि फक्त वरवरच्या गोष्टींमध्ये रस घेत नाहीत तर मुद्दांबाबत तपशीलाने जाणून घेतात.’
दरम्यान, आता राहुल गांधींच्या याच मुद्द्यावरुन भाजपच्या नेत्यांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधी हे फूटीचं राजकारण करत असल्याची टीका देखील भाजप नेते करत आहेत. त्यामुळे आता पुढील काही दिवसात या संपूर्ण प्रकरणावरुन आणखी गदारोळ माजण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT