न्यू यॉर्क: पाकिस्तान (Pakistan) काश्मीरबाबत आपला घृणास्पद विचार कधीही सोडत नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत (UNGA)पुन्हा एकदा काश्मीरबाबत (Kashmir) सूर आळवला आहे. पण नेहमीप्रमाणे या वेळीही त्याला भारताकडून (India) चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताच्या पहिल्या सचिव स्नेहा दुबे (Sneha Dubey) यांनी स्पष्टपणे सांगितले की, दहशतवाद्यांना उघडपणे पाठिंबा देणं हा आजवरचा पाकिस्तानचा इतिहास आहे.
ADVERTISEMENT
स्नेहा दुबे यांनी उत्तर देण्याचा अधिकार (Right to Reply) वापरून उत्तर दिले. त्या म्हणाल्या, ‘पाकिस्तानच्या नेत्याने संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठाचा वापर करून माझ्या देशाविरुद्ध खोटा आणि द्वेष भावनेने प्रचार करण्याची ही काही पहिली वेळ नाही.
आपल्या देशातील वाईट परिस्थिती जगाला दिसू नये यासाठी पाकिस्तानी नेते संपूर्ण जगाचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. जिथे दहशतवादी मुक्तपणे फिरतात. तर सामान्य नागरिक, विशेषत: अल्पसंख्यांक समाजातील लोकांवर अत्याचार केले जातात.’ असं चोख उत्तर स्नेहा दुबे यांनी दिलं आहे.
कोण आहे स्नेहा दुबे?
इम्रान खानला संपूर्ण जगासमोर योग्य शब्दात सुनावणाऱ्या स्नेहा दुबे यांची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे. स्नेहा दुबे यांनी पहिल्याच प्रयत्नातच यूपीएससीमध्ये (UPSC) यश मिळवले. 2012 च्या बॅचच्या त्या महिला अधिकारी आहेत. आयएफएस (indian foreign service) झाल्यानंतर त्यांची परराष्ट्र मंत्रालयात नियुक्ती झाली होती. 2014 मध्ये त्यांना माद्रिद येथील भारतीय दूतावासात पाठवण्यात आले होते.
सध्या त्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताच्या पहिल्या सचिव आहेत. आंतरराष्ट्रीय बाबींमध्ये स्वारस्य असल्यामुळे स्नेहा दुबे यांनी भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला होता. स्नेहा यांनी जेएनयूमधून शिक्षण घेतले आहे. त्यांनी येथून एमए आणि एमफिलचं शिक्षण पूर्ण केले आहे.
स्नेहा दुबे आणि पुण्याचं नातं..
स्नेहा यांचे सुरुवातीचे शिक्षण गोव्यात झाले. यानंतर त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. स्नेहा दुबेने एकदा सांगितले होते की, त्यांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती ही कधीही नागरी सेवेत नव्हती. स्नेहाचे वडील एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करतात. त्याची आई शिक्षिका आहे. तर भाऊ व्यवसायिक आहे.
गोवा, पुणे आणि दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून शिक्षण घेऊन स्नेहा दुबे या सध्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. एवढंच नव्हे तर शत्रू राष्ट्राचं सत्यही त्या जगासमोर निर्भिडपणे मांडत आहेत.
स्नेहा दुबे यांनी पाकिस्तानची लक्तरं टांगली वेशीवर
संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताच्या पहिल्या सचिव स्नेहा दुबे म्हणाल्या, ‘दहशतवाद्यांना आश्रय देणं हा पाकिस्तानचा इतिहास आहे. अनेक देशांना याची माहिती देखील आहे की, दहशतवाद्यांना आश्रय देणे, सक्रियपणे पाठिंबा देणे हे पाकिस्तानात खुलेआम सुरु आहे. खरं म्हणजे हे त्यांचे धोरणच आहे. हा एक असा देश आहे जो जागतिक स्तरावर दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रे पुरवणे आणि आर्थिक मदत करणे यासाठी ओळखला जातो.’ असं म्हणत स्नेहा दुबे यांनी पाकिस्तानची अक्षरश: लक्तरं काढली.
‘बोल ना आंटी आऊं क्या?’ गाणाऱ्या मुलामुळे रद्द झाली पाकिस्तान-न्यूझीलंड सीरिज! वाचा काय घडलं?
संपूर्ण जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे!
पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देताना स्नेहा दुबे यांनी यूएनमध्ये ठामपणे सांगितलं की, ‘जम्मू -काश्मीर आणि लडाखचा संपूर्ण भाग भारताचा आहे. तो अविभाज्य भाग होता, आहे आणि राहीलही. यामध्ये तो भागही आहे जिथे पाकिस्तानने बेकायदेशीर ताबा मिळवला आहे. आम्ही पाकिस्तानला आवाहन करत आहोत की, त्यांनी जो काही भाग अवैधपणे ताब्यात ठेवला आहे तो त्यांनी तात्काळ खाली करावा.’ अशा शब्दात स्नेहा दुबे यांनी पाकिस्तानला सुनावलं आहे.
ADVERTISEMENT