सोमवारी धारावी येथे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. दहावी बारावी बोर्डाची परीक्षा घेण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध करत विद्यार्थ्यांनी आक्रमक आंदोलनं केले होते. या आंदोलनाला चिथावणी देणाऱ्या हिंदुस्थानी भाऊला धारावी पोलिसांनी अटक केली आहे. हिंदुस्थानी भाऊ नावाने सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेल्या विकास पाठक यांनीच दहावी आणि बारावीच्या मुलांना आंदोलनासाठी चिथावणी दिली, असा त्यांच्यावर आरोप आहे. हिंदुस्थानी भाऊ यांच्या व्हिडिओनंतर हे आंदोलन भडकल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक करण्यात आलं आहे. हिंदुस्थानी भाऊ अर्थात विकास पाठक आणि आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. इकरार वकार खान असं अटक करण्यात आलेल्या दुसऱ्या तरूणाचं नाव आहे.
ADVERTISEMENT
काय आहे प्रकरण?
आधीच्या दोन वर्षाच्या तुलनेत यंदा कोरोना परिस्थिती नियंत्रणात आलेली असून, दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. मात्र, शिक्षण विभागाच्या या निर्णयाला विद्यार्थ्यांनी विरोध केला असून, सोमवारी राज्यात ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठकने चिथावणी दिल्याचा आरोप आहे. त्यावरूनच त्याला अटक करण्यात आली आहे.
वर्षा गायकवाड नेमकं काय म्हणाल्या?
विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिक्षणमंत्री म्हणाल्या,’विद्यार्थी दुहेरी लढाई लढत आहेत. विद्यार्थ्यांवर खूप दडपण आणि तणाव आहे. विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि विद्ययार्थ्यांची सुरक्षितता, हे मुद्दे सरकारच्या दृष्टीनं महत्वाचे आहेत. परीक्षेचा निर्णय हा तज्ञ मंडळींशी चर्चा करूनच घेतलेला आहे’,
कोण आहे हिंदुस्थानी भाऊ?
हिंदुस्तानी भाऊचे नाव विकास पाठक असे आहे. या हिंदुस्तानी भाऊने विद्यार्थ्यांना भडकावल्याचा आरोप आहे.’पहली फुरसतमे निकल’ हे वाक्य तुम्ही याआधी ऐकलंच असेल. य़ा वाक्याने आणि विकासच्या व्हिडीओने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकुळ घातला होता. मुंबईतच विकासचा जन्म झाला. त्याचा आवडता अभिनेता संजय दत्त आहे त्यामुळे विकासने त्याचा लुकही संजयसारखा केला आहे. युट्युबवर फेमस होण्याआधी विकासने प्रचंड मेहनत आणि कठीण काळ पाहिला आहे. त्यातून परिश्रम घेत आज तो प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. विकासचे वडिलांची तो लहान असतानाच नोकरी गेली आणि त्यानंतर घराची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली. अशावेळी घरोघरी अगरबत्ती विकणे, वेटर ही कामे त्याने केली. याचकाळात त्याचं शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं आणि सातवीमध्येच त्याने शिक्षण सोडलं. त्यानंतर मुंबईच्या एका स्थानिक वृत्तपत्रासाठी रिपोर्टर म्हणूनही काम केलं.
फेब्रुवारी 2019 मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यावर त्याने एक व्हिडीओ तयार केला होता. विकासचा हा व्हिडीओ एका रात्रीत व्हायरल झाला. त्यानंतर विकासने देशाशी संबंधीत मुद्द्यांवर भाष्य करणारे व्हिडीओ करण्यास सुरुवात केली. त्याच्या व्हिडीओला आणि स्टाइलला लोकांनी खूप पसंत केलं. विकासच्या व्हिडीमधील ‘रूको जरा सबर करो’ हा डायलॉग खूप फेमस झाला.
ADVERTISEMENT