मुंबईत 12 रुग्णालयांमध्ये हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाची लवकरच उभारणी

मुंबई तक

• 08:01 AM • 24 Apr 2021

कोरोनाची रूग्णसंख्या वाढत असताना ऑक्सिजनची कमतरता जाणवू नये यासाठी मुंबई महापालिकेकडून पुढाकार घेण्यात आला आहे. यानुसार 12 रुग्णालयांमध्ये एकूण 16 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्‍प येत्या महिन्याभरात उभारण्यात येणार आहेत. हवेतून ऑक्सिजन निर्मिती करून या 16 प्रकल्पांच्या माध्यमातून एकूण 43 मेट्रिक टन ऑक्सिजन तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पांमुळे ऑक्सिजन पुरवठ्यावरील महानगरपालिकेचं परावलंबित्व होणार कमी होण्यास मदत […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

कोरोनाची रूग्णसंख्या वाढत असताना ऑक्सिजनची कमतरता जाणवू नये यासाठी मुंबई महापालिकेकडून पुढाकार घेण्यात आला आहे. यानुसार 12 रुग्णालयांमध्ये एकूण 16 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्‍प येत्या महिन्याभरात उभारण्यात येणार आहेत. हवेतून ऑक्सिजन निर्मिती करून या 16 प्रकल्पांच्या माध्यमातून एकूण 43 मेट्रिक टन ऑक्सिजन तयार करण्यात येणार आहे.

हे वाचलं का?

या प्रकल्पांमुळे ऑक्सिजन पुरवठ्यावरील महानगरपालिकेचं परावलंबित्व होणार कमी होण्यास मदत होणार आहे. यासाठी निविदाही मागवण्यात आल्या आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी.वेलरासू यांच्या नियंत्रणाखाली हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे.

सध्या राज्यासह मुंबईत कोरोनाच्‍या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलीये. बाधित रुग्‍णांच्‍या फुप्‍फुसांना होणारा संसर्ग लक्षात घेता, त्‍यांना सातत्‍याने आण‍ि अधिक क्षमतेने ऑक्सिजन पुरवावा लागतो. यामुळे देशभरातील रुग्‍णालयांकडून प्राणवायूची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ऑक्सिजन उत्‍पादक आणि वाहतूकदारांच्‍या क्षमता आणि मर्यादा लक्षात घेता मागणी व पुरवठा यांचा मेळ घालताना राज्य सरकार व पालिका प्रशासन यांची कसरत होतेय.

मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांत खाजगी आणि पालिका रुग्णालयांमधील ऑक्सिजन संपल्यावर रुग्णांना इतर रुग्णालयात हलवावं लागलं. यामुळे पालिका आणि वैद्यकीय यंत्रणेवरील वाढता ताण लक्षात घेता पालिकेच्‍या रुग्‍णालयांमध्‍ये स्‍वतःचे प्राणवायू निर्मिती प्रकल्‍प उभारण्‍याचा निर्णय घेण्यात आलाय. यामुळे ऑक्सिजनच्या उपलब्‍धतेतील अडथळे कमी होतील.

ऑक्सिजन पुरवठादारांकडून जंबो सिलेंडरद्वारे मिळणाऱ्या ऑक्सिजनच्या खर्चाशी तुलना केली तर त्‍याच्‍यापेक्षा अर्ध्‍याहून अधिक कमी किमतीत या प्रकल्‍पांमधून ऑक्सिजन निर्मिती होईल. हे प्रकल्‍प किमान15 वर्षे ते कमाल 30 वर्षे संचालित होऊ शकतात. परिणामी महानगरपालिकेच्‍या आर्थिक खर्चात बचत करण्‍यासाठी देखील हे प्रकल्‍प अत्‍यंत उपयुक्‍त ठरणार आहेत. या १६ प्रकल्‍पांचा एकूण खर्च अंदाजे 90 कोटी रुपये इतका अपेक्षित आहे.

या प्रकल्‍पाद्वारे असा तयार होणार ऑक्सिजन

वातावरणातील हवा शोषून, पी.एस.ए. (pressure swing adsorption) तंत्राचा वापर करुन रुग्‍णांना ऑक्सिजनचा पुरवठा करताना पहिल्यांदा संयंत्रांमध्‍ये योग्‍य दाबाने हवा कॉम्प्रेस केली जाते. त्‍यानंतर ती हवा फ‍िल्‍टर करण्‍यात येते. त्‍यामुळे हवेतील अशुद्ध आणि अयोग्‍य घटक गाळून वेगळे केले जातात. यानंतर उपलब्‍ध झालेली शुद्ध हवा ‘ऑक्‍स‍िजन जनरेटर’ मध्‍ये संकलित केली जाते. ऑक्‍स‍िजन जनरेटरमध्‍ये असलेल्‍या झि‍ओलीट (Zeolit) या रसायनयुक्‍त मिश्रणाद्वारे या शुद्ध हवेतून नायट्रोजन आणि ऑक्‍स‍िजन हे दोन्‍ही वायू वेगळे केले जातात. वेगळा केलेला ऑक्‍स‍िजन हा योग्‍य दाबासह साठवून पाईपद्वारे रुग्‍णांपर्यंत पोहोचवला जातो.

    follow whatsapp