गिरणी कामगारांच्या संघर्षातील बिन्नीचे नेते दत्ता इस्वलकर यांच्या निधनाने कामगार चळवळीच्या इतिहासाचं एक पर्व संपलं आहे.
ADVERTISEMENT
गिरणी कामगार हा मुंबईचा मानबिंदू. या कामगार चळवळीला मोठा इतिहास आहे. सामाजिक राजकीय, सांस्कृतिक किंवा साहित्यिक अशा सर्वच क्षेत्रात गिरणी कामगारांच्या संघर्षाचा आजही प्रभाव आहे. अनेक दिग्गजांनी या चळवळीचं नेतृत्व केलंय. मात्र कामगार ते कामगार नेता हा इस्वलकरांचा प्रवास एखाद्या सिनेमाच्या पटकथेला शोभावा असाच आहे.
ऐंशीच्या दशकात गिरणी कामगारांचा व्यापक संप डॉ. दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली झाला. या संपाने मुंबईच नव्हे तर महाराष्ट्र ढवळून निघाला. मुंबईचा तर नक्शाच बदलून गेला. या संपाने शेकडो कुटुंबांची वाताहत झाली. मुजोर गिरणी मालक, सरकारची निष्क्रियता यात गिरणी कामगार भरडला गेला.
दत्ता सामंत यांच्या खूनानंतर गिरणी कामगारांचा संघर्ष जणू ‘निर्नायक’ झाला. सगळी आशा संपली आणि हवालदिल परिस्थिती उद्भवली. शस्त्रं मोड़ून पडली. हतबल झालेले लोक पोटापाण्यासाठी दाही दिशा विखुरले गेले. अशा स्थितीत दत्ता इस्वलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चळवळीला पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न केला. दत्ता इस्वलकर हे मॉडर्न मिलमध्ये कामाला होते. मात्र राष्ट्र सेवा दल, शोषितांच्या चळवळीत सक्रिय असल्याने वैचारिक बैठक पक्की होती. निराश न होता चिकाटीने संघर्ष करणाची ज़िद्द होती. याविषयी बोलताना इस्वलकर म्हणत, मी काही नेता नव्हतो, मी नेता झालो तो अपघातानेच.
दत्ता इस्वलकरांच्या नेतृवाखाली बंद गिरणी संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. कामगारांनीच आपली संघटना सुरू करून नवा इतिहास सुरू केला. एका वेगळ्याच धाटणीने मग चळवळ कार्यरत झाली. मालक – सरकार सोबत संघर्ष सुरूच होता. दुसऱ्या बाजुला आपली संघटना व्यापक करण्याचा प्रयत्न इस्वलकरांनी केला. नाट्य, सिनेमा, साहित्य, संस्कृती या क्षेत्रातील मान्यवर केवळ गिरणी कामगारांसोबत उभे राहिले नाहीत, तर रस्त्यावरही उतरले हे विशेष.
आंदोलनंही अनोखी होती. गिरणी कामगारांच्या मुलांनी सरकारला पत्र लिहिणं, मुलांचा मोर्चा काढणं…या प्रकारांनी सरकारवर दबाव यायचा. यात सगळ्यात कडी केली ती चड्डी-बनियन मोर्चाने. ‘१९४२-चले जाव’ चळवळीच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव मुंबई आले होते. त्यावेळी गिरणी कामगार संघर्ष समितीने ‘चड्डी बनियन’ मोर्चा आयोजित केला. आम्ही बापुंचे खरे वारसदार आहोत, त्यांचंच अनुकरण करत चड्डी-बनियन मोर्चा काढतोय, असं सांगत कामगार रस्त्यावर उतरले. पोलिसांनी लाठीमार केला. माध्यमांनीही याची दखल घेतली. सरकारची तर गोची झाली.
मुंबईत गिरण्या राहिलेल्या नाहित. गिरणगाव आता गणपतीचं गाव झालंय. गिरण्यांचं पद्धतशीर नामोनिशाण मिटवलं गेलंय. मात्र तरीही गिरणी कामगार म्हणून ओळख अबाधित राहिली ती दत्ता इस्वलकर आणि सहकाऱ्यांमुळेच. हे देशात एकाही कंपनीच्या कामगारांबाबत घडलेलं नाहीय.
केवळ आपला प्रश्न, आपला लढा असं इस्वलकरांनी कधी केलं नाही. आणीबाणी, मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यासाठीचा लढा, शेतकरी, कष्टकरी, विस्थापित, अन्यायग्रस्त यांच्यासाठी लढताना इस्वलकरांनी प्रसंगी तुरूंगवासही भोगलाय. मुंबईत गरिबांना परवडणारी घरं मिळावीत यांसाठी गेली दहा वर्ष इस्वलकर सक्रिय होते.
असंख्य गिरणी कामगारांना मुंबईत हक्काचं घर मिळालंय. शेकडो कामगारांना हा हक्क मिळणार आहे. मात्र नेतृत्वाची नैतिकता कशी असावी तर इस्वलकरांसारखी. ‘माझ्या कामगारांना घरं मिळाल्या नंतरच आम्ही घरं घेवू ही इस्वलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांची भूमिका. कामगार म्हणून एका छोट्या खोलीत रहाणाऱ्या इस्वलकरांनी त्याच जागेतून जगाचा निरोप घेतला.
जग सुंदर बनवायला निघालेली ही माणसं या कुरूप जगात दुर्मिळच.
दत्ताभाऊ… तुमच्या स्मृतीला सलाम !
ADVERTISEMENT