पुणे शहरातील एका नामांकित रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या सर्विस क्वॉर्टरमध्ये स्पाय कॅमेरा बसवण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हा कॅमेरा महिला डॉक्टरच्या खोलीतील बेडरुम आणि बाथरुममध्ये बसवण्यात आला होता. ३१ वर्षीय महिला डॉक्टर ही एका नामांकित महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयात काम करते. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
पीडित महिला डॉक्टर या खोलीत आपल्या आणखी एका महिला सहकाऱ्यासोबत राहते. मंगळवारी संध्याकाळी रुग्णालयातलं काम संपवून ही महिला डॉक्टर आपल्या खोलीवर फ्रेश होण्यासाठी आली होती. यावेळी तिने बाथरुमची लाईट लावण्याचा प्रयत्न केला असता ती सुरु झाली नाही. बेडरुमची लाईटही सुरु होत नसल्यामुळे या महिला डॉक्टरने इलेक्ट्रीशीअनला बोलावलं.
इलेक्ट्रिशीअन दुरुस्तीसाठी आल्यानंतर त्याने बाथरुममधील बल्बचे होल्डर उघडले असता त्यात स्पाय कॅमेरा, मेमरी कार्ड आणि बॅकअप आढळला. यानंतर बेडरुमच्या बल्बमधील होल्डरमध्येही अशाच पद्धतीने स्पाय कॅमेरा आढळून आला. यानंतर महिला डॉक्टरने तात्काळ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. या सर्विस क्वॉर्टरमध्ये सीसीटीव्ही फुटेज नसल्यामुळे महिला डॉक्टरच्या खोलीत कोण आलं याचा तपास पोलीस करत आहेत.
ADVERTISEMENT