ST Strike : निलंबनाच्या धास्तीने एसटी कर्मचाऱ्याने घेतलं विष; मृत्यूशी झुंज सुरू

मुंबई तक

• 03:08 AM • 17 Nov 2021

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप दिवसेंदिवस लांबतच चालला आहे. 11 दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत असून, एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांविरुद्ध निलंबनाच्या कारवाईचं अस्त्र उगारलं आहे. निलंबनाच्या याच भीतीतून बुलढाणा जिल्ह्यात संपात सहभागी झालेल्या एका एसटी कर्मचाऱ्याने विषारी द्रव्य प्राशन केल्याची घटना घडली आहे. त्याला उपचारासाठी अकोल्याला हलवण्यात आलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव डेपोमध्ये कार्यरत असलेल्या […]

Mumbaitak
follow google news

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप दिवसेंदिवस लांबतच चालला आहे. 11 दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत असून, एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांविरुद्ध निलंबनाच्या कारवाईचं अस्त्र उगारलं आहे. निलंबनाच्या याच भीतीतून बुलढाणा जिल्ह्यात संपात सहभागी झालेल्या एका एसटी कर्मचाऱ्याने विषारी द्रव्य प्राशन केल्याची घटना घडली आहे. त्याला उपचारासाठी अकोल्याला हलवण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव डेपोमध्ये कार्यरत असलेल्या विशाल प्रकाश अंबळकार यांनी निलंबनच्या चिंतेतून विष प्राशन केल्याचं त्यांच्या वडिलांनी सांगितलं. विशाल अंबळकार गेल्या ११ दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी झालेले आहेत.

संपात सहभागी झालेल्या आणि कामावर परतण्यास इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांना विरोध करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. निलंबनाच्या याच चिंतेतून 29 वर्षीय विशाल अंबळकार यांनी विष प्राशन केलं.

माटरगावमधील राहत्या घरात त्यांनी विष प्राशन केलं. त्यानंतर याची माहिती त्यांनी वडिलांना दिली. त्यानंतर त्यांना तातडीने खामगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले. पण, प्रकृती ढासळल्याने त्यांना अकोला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं.

विशाल अंबळकार यांच्या वडिलांनी या घटनेबद्दलची माहिती दिली. निलंबनाच्या भीतीमुळे तो मागच्या ४ दिवसांपासून चिंतेत होता. याचं चिेंतेतून त्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. माझी सरकारला विनंती आहे की, एसटी कर्मचाऱ्यांनी टोकाची पावलं उचलू नयेत म्हणून त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणीही त्यांनी सरकारकडे केली. विशालच्या पगारावरच त्याच्या घराचा उदरनिर्वाह चालतो.

    follow whatsapp