दिवाळीपासून सुरू असलेला एसटी कामगारांचा संप अद्यापही सुरूच आहे. एसटी कामगार आणि सरकारमधील कोंडी अद्याप फुटलेली नसून, दिवसेंदिवस संप चिघळताना दिसत आहे. असं असलं तरी काही ठिकाणी कर्मचारी कामावर परतत असल्याचं चित्र असून, बसेसही धावत आहेत. धुळे आगारातून 14 बसेस सोडण्यात आल्या. मात्र, 4 बसेसवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली.
ADVERTISEMENT
एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागण्यांसाठी 14 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. धुळ्यातही एसटी कामगार संपावर आहेत. दरम्यान धुळे आगार प्रशासनाने बसेस सोडण्याचा निर्णय घेतला. सकाळी 14 बसेस आगारातून सोडण्यात आल्या.
बसेस सोडण्याच्या पार्श्वभूमीवर आगार परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. बसेस जाणाऱ्या मार्गांवरही पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र, बसेस मार्गस्थ होत असताना 4 बसेसना लक्ष्य करण्यात आलं. अज्ञातांकडून बसेसवर दगडफेक करण्यात आली. अचानक झालेल्या या हल्ल्यानं पोलिसांची धांदल उडाली. या घटनेत एक एसटी कर्मचारी जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.
एसटी कामगार मागणीवर ठाम
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर उच्च न्यायालयातही सुनावणी सुरू आहे. दुसरीकडे एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाबद्दल राज्य सरकारकडून पावलं उचलली जात आहे. मात्र, ठोस तोडगा निघत नसल्याने संप चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.
आता मुंबईतील आझाद मैदानात राज्यभरातून एसटी कर्मचारी येताना दिसत आहे. अनेक ठिकाणी मुंबईकडे येणाऱ्या एसटी कामगारांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आल्याच्याही घटना घडल्या आहेत. दिवसेंदिवस आंदोलनाचा जोर वाढताना दिसत आहे.
फेसबुकवरून आवाहन
राज्यातील प्रत्येक आगारातून शंभर कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात येण्याचं आवाहन संपकरी कामगारांनी केलेलं आहे. येताना कर्मचाऱ्यांनी पेमेंट स्लीप, आधार कार्ड, मास्क जवळ बाळगावे. तसेच मैदानात राहण्यासाठी कपडे सोबत ठेवावेत, असं आवाहन फेसबुकच्या माध्यमातून आझाद मैदानातील कर्मचाऱ्यांनी अन्य संपकरी कर्मचाऱ्यांना केलेलं आहे.
ADVERTISEMENT