आतापर्यंत लग्न मोडण्याची अनेक कारण आपण पाहिली असतील. परंतू पालघर जिल्हातील एका घटनेत नवऱ्या मुलाने साखरपुड्याच्या सोहळ्याला हलक्या प्रतीचं कुंकू लावल्याचं कारण देत आपलं लग्नचं मोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर नवऱ्या मुलीच्या घरातल्या लोकांनी वाडा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत घडलेल्या प्रकाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अजब कारण देऊन लग्न मोडल्याचं हे प्रकरण सध्या पालघर आणि वाडा परिसरात चर्चेचा विषय बनलं आहे.
ADVERTISEMENT
भिवंडी तालुक्यातील घोटगाव येथील सिव्हील इंजिनीअर असलेल्या मुलाचं वाडा येथील मुलीसोबत लग्न ठरलं होतं. मुलगा आणि मुलगी दोन्ही उच्चशिक्षीत असल्यामुळे पुढे लग्नकार्यात कोणतंही विघ्न येणार नाही अशी सर्वांना खात्री होती. दोन दिवसांपूर्वी मुलीच्या घरी वाडा येथे साखरपुड्याचा सोहळा पार पडला. मात्र सोहळा उरकून घरी पोहचल्यानंतर हा मुलगा मुलीकडच्या लोकांना प्रतिसाद देत नव्हता.
अखेरीस मुलीच्या वडिलांनी नवऱ्या मुलाच्या काकांना फोन करत याबाबत विचारणा केली. यावेळी बोलत असताना तुम्ही कार्यक्रमात हलक्या प्रतीचं कुंकू वापरल्यामुळे आता हे लग्न होऊ शकणार नाही असं कारण मुलाच्या घरच्यांनी दिलं. मुलाच्या घरच्यांनी दिलेल्या या हास्यास्पद कारणानंतर धक्का बसलेल्या मुलीच्या वडिलांनी वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गेला आहे. या घटनेनंतर वाडा पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.
ADVERTISEMENT