कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मुंबईसह महाराष्ट्रात वाढला आहे. त्यामुळे आठवड्यातले पाच दिवस कठोर निर्बंध आणि त्यानंतर वीकएन्ड लॉकडाऊनचा निर्णय 30 एप्रिलपर्यंत घेण्यात आला आहे. वीकएन्ड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत शुकशुकाट दिसून आला. शुक्रवारपर्यंत गर्दी असलेल्या रस्त्यांवर शनिवारी मुळीच गर्दी नव्हती. रेल्वे स्थानकांवरही गर्दी नव्हती.
ADVERTISEMENT
राज्य सरकारने कठोर निर्बंध लादूनही मुंबई आणि राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे. त्यामुळे आता वीकएन्ड लॉकडाऊनमध्ये पोलिसांनी शुक्रवारी रात्री ८ नंतरच गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे रस्त्यावर कुणीही कामाशिवाय फिरकताना दिसत नाहीये. अत्यावश्यक सेवा वगळता खासगी वाहतूकही मुंबईत बंद ठेवण्यात आली आहे. दादर, अंधेरी, वांद्रे, मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस या भागांमधले रस्तेही ओस पडल्याचं चित्र दिसतं आहे.
‘या’ एका कारणामुळे पुण्यावर ओढावली ‘मिनी लॉकडाऊन’ची वेळ!
राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधाच्या कठोर निर्बंधांची अंमलबजावणी केल्यानंतरही मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकात प्रवाशांकडून नियमांचं उल्लंघन होताना दिसतं आहे. रेल्वे स्थानकात प्रवासी एकमेकांना खेटून चालत होते आणि लोकलमध्येही गर्दी होताना दिसत होती. त्यामुळे कुर्ला स्थानक परिसरातही पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कुर्ला स्थानकात वीकएन्ड लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी झाल्याने या भागातली सुमारे 90 टक्के वर्दळ कमी झाली आहे.
मुंबईत शुक्रवारी दिवसभरात 9 हजार 200 कोरोना रूग्णांची नोंद झाली. तर 35 जणांचा मृत्यू झाला. या 35 पैकी 28 जणांना दीर्घकाली आजार होते. मृतांमध्ये 19 पुरूष आणि 16 महिलांचा समावेश आहे.
ADVERTISEMENT