वाढदिवसाचा केक कापत असताना पत्नीचं नवऱ्याशी भांडण झालं, त्यानंतर सकाळी पत्नीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्यामुळे वाढदिवसाच्या दिवसाच्या रंगाचा बेरंग झाला आहे. ही घटना कळल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
ADVERTISEMENT
ही धक्कादायक घटना नोएडामध्ये घडली आहे. सेक्टर 119 च्या एल्डिको आमंत्रण या सोसायटीत राहणाऱ्या सोनम सिंह यांनी मृत्यूला कवटाळलं आहे. सोनम आणि त्यांचा पती उत्तम कुमार हे या घरात राहात होते. उत्तम कुमार हे एका बड्या कंपनीत इंजिनिअर आहेत. या दोघांना १० वर्षांचा एक मुलगाही आहे. शुक्रवारी सोनम यांचा वाढदिवस होता. त्यामुळे गुरूवारी रात्री बारा वाजता केक कापण्यात आला. केक कापत असतानाच सोनम आणि उत्तम यांच्या काहीतरी कारणावरून वाद झाला.
काही वेळ वाद झाल्यानंतर वाद मिटला. सोनम झोपायलाही निघून गेली. सकाळी पती उत्तम यांनी तिला आवाज दिला. मात्र तिने ओ दिलीच नाही. त्यानंतर पती उत्तमने दरवाजा उघडला तर सोनम पंख्याला लटकलेल्या अवस्थेत त्यांना दिसली. यानंतर त्यांनी शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावलं आणि पोलिसांनाही शेजाऱ्यांनी या ठिकाणी बोलावलं.
पोलिसांनी सोनमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आता पोलीस सोनमच्या पतीची चौकशी करत आहेत. या दोघांमध्ये नेमका काय वाद झाला होता की ज्यावरून सोनमने हे टोकाचं पाऊल उचललं? याचा तपास पोलीस करत आहेत. ज्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सोनमचा वाढदिवस होता त्याच दिवशी तिचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
ADVERTISEMENT