देशातल्या तरूण पिढीची मानसिकता बिघडवत आहात असे ताशेरे झाडत निर्मात्या एकता कपूर यांना सुप्रीम कोर्टाने फटकारलं आहे. एकता कपूर यांच्या ALT बालाजी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही वेब सीरिज दाखवल्या जात आहेत. त्यामुळे तरूणांची मानसिकता बिघडत असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
काय आहे प्रकरण?
बॉलिवूडची प्रसिद्ध निर्माती-दिग्दर्शिका एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर या दोघींविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. बेगुसराय, बिहार येथील न्यायालयाने एकता कपूरच्या XXX या वेब सीरिजविरुद्ध अटक वॉरंट पाठवले होते. एकतावर आरोप आहे की, तिने या वेब सीरिजमध्ये सैनिकांच्या पत्नीची आक्षेपार्ह प्रतिमा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे बेगुसराय न्यायदंडाधिकारी विकास कुमार यांच्या न्यायालयातून वॉरंट जारी करण्यात आले आहे. दरम्यान, आता सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी निर्माती एकता कपूरला चांगलेच फटकारले आहे. तिच्याविरुद्ध जारी केलेल्या अटक वॉरंटला तसेच पोलिसांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. त्यावेळी तुमच्यामुळे तरूणाई बिघडते आहे असं एकता कपूर यांना कोर्टाने सुनावलं आहे.
एकता कपूर यांच्या ALT बालाजीवरच्या XXX या वेबसीरिजवरून वाद
एकता कपूर यांच्या ALT बालाजीवरच्या XXX या वेबसीरिजवरून वाद निर्माण झाला आहे. या वेबसीरिमध्ये सैनिकांचा अपमान आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भावना दुखावल्याचा आरोप आहे. न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि न्यायमूर्ती सिटी रविकुमार यांच्या खंडपीठाने हे म्हटलं आहे की तुम्ही तरूणांना असा कंटेट दाखवून त्यांची मनं दुषित करत आहात.
कपूर यांचे अधिवक्ता मुकुल रहतोगी यांनी काय म्हटलं आहे?
कपूर यांचे अधिवक्ता मुकुल रहतोगी यांनी सुप्रीम कोर्टात हे सांगितलं आहे की या प्रकरणी आम्ही पाटणा उच्च न्यायालयात याचिका केली आहे. तिथे लवकर सुनावणीला येईल असं मला वाटत नाही. अशा एका अन्य प्रकरणात सुप्रीम कोर्टाने त्यांना संरक्षण दिलं होतं. ज्या वेब सीरिजवरून वाद निर्माण झाला आहे ती फक्त सबस्क्रिप्शन घेणाऱ्यांसाठी आहे. या देशात लोकांना त्यांचा पर्याय निवडण्याचं स्वातंत्र्य आहे.
यानंतर सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं आहे?
तुम्ही लोकांपुढे कोणते पर्याय ठेवत आहात? या प्रकरणाच्या याचिका केल्याबद्दल तुम्हाला दंड ठोठावला जाऊ शकतो. तुम्ही चांगले वकील असाल पण तुम्ही न्यायालयाचा वेळ वाया घालवू शकत नाही. आम्ही खालच्या कोर्टाच्या आदेश वाचला आहे तिथे स्थानिक वकील नेमून तुम्ही अर्जाची सद्यस्थिती तपासून पाहू शकता असंही कोर्टाने सुनावलं.
ADVERTISEMENT