पुणे: एकनाथ शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरोधात पुरावे नाहीत म्हणून ईडीनं क्लोजर रिपोर्ट दिला आहे. ज्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते त्यावेळी भाजप नेते किरीट सोमय्यांनी सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. त्यानंतर ईडीनं प्रताप सरनाईक यांची चौकशी सुरु केली होती. आता राज्यात भाजप-शिंदे गटाचं सरकार स्थापन झालं आहे, त्यामुळे मागे शिवसेनेत असलेल्या नेत्यांना आता क्लिनचीट देण्यात येत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनीही भाजपनं सरनाईक कुटुंबाची माफी मागावी अशी मागणी केली आहे.
ADVERTISEMENT
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
”मी महिला खासदार म्हणून संसदेत हा मुद्दा उपस्थित करणार आहे. आणि हा प्रश्न अमित शाहांना विचारणार आहे. प्रताप सरनाईक यांनी याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं. ”आपण भाजपसोबत जाऊया” अशा आशयाचं ते पत्र होतं. अशाप्रकारचे गंभीर आरोप झाल्यानंतर कुटुंब कोणत्या परिस्थितीतुन जातं याचा विचार कधी केला का आणि आता तुम्ही म्हणता की त्यांच्या विरोधात काहीच पुरावे नाहीत. या प्रकरणात तुम्ही आधी आरोप केले ते खोटे होते का?.” असा प्रश्न सुप्रिया सुळेंनी विचारला आहे.
सरनाईक कुटुंबावर केलेल्या आरोपांमुळे आता भारतीय जनता पार्टीने सरनाईक कुटुंबीयांची हात जोडून माफी मागावी आणि जर त्यांच्यवर झालेले आरोप खोटे असतील तर भाजपने महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणीही सुप्रिया सुळेंनी केली आहे.
प्रताप सरनाईक यांच्यावर काय आरोप झाले होते?
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रताप सारनाईक यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यावेळी राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार होतं. सोमय्यांनी आरोप केल्यानंतर ईडीने प्रताप सारनाईक यांच्यावर नॅशनल स्पॉट एसक्सचेंज (NSEL) प्रकरणात ११.३० कोटी रुपयांची मनी लॉन्ड्रींग केल्याची नोटीस सरनाईक यांना बजावली होती. या प्रकरणात प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहान सरनाईक यांची चौकशी ईडीकडून करण्यात आली होती.
ADVERTISEMENT